मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, ट्रीटमेंट सुपरवायझर सचिन मस्के यांना गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता. या तणावातूनच त्यांची प्रकृती बिघडून ते अधिकाऱ्यांच्या दालनातच कोसळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. या घटनेनंतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
एनएचएम कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा विजया कांबळे यांनी डॉ. हराळकर यांच्यावर कर्मचाऱ्यांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांना नासके कांदे हत्ती” आणि बिनकामाचे अशा शब्दांत हिणवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सचिन मस्के यांची प्रकृती बिघडल्यानंतरही वैद्यकीय अधिकारी म्हणून आवश्यक मदत करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत
कामगार नेते जनार्दन शिंदे यांनीही डॉ. हराळकर यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मस्के यांना चक्कर आल्यानंतर हे ढोंग करत आहेत अशी टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे वर्तन संवेदनशील आरोग्य व्यवस्थेला शोभणारे नसल्याचे त्यांनी म्हटले. तर कामगार नेते बापू सदाफुले यांनी दोन वेळा बदलीचे आदेश होऊनही त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवरही टीका केली.
गेल्या अडीच वर्षांपासून मी विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळत आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामुळे कामाचा ताण वाढला आहे. कामाबाबत शिस्त लावल्यामुळे काहींना ते रुचत नाही. मी कोणालाही अपमानास्पद वागणूक दिलेली नाही. डॉ. अरुंधती हराळकर – क्षयरोग अधिकारी
कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाने महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेत, नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांची भेट घेतली. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर महापौर कोंड्याल यांनी दहा दिवसांच्या आत नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.






