
photo- yandex
Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
पावसाळ्यानंतर आणि बदलत्या ऋतूंच्या काळात डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. घराच्या परिसरात, छतावर, टायरमध्ये, कुंड्यांमध्ये तसेच इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवावीत आणि परिसरात नियमित स्वच्छता राखावी.
ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या किंवा जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वतःच्या मनाने औषधे घेण्याऐवजी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास आजाराची तीव्रता व गुंतागुंत कमी करण्यास मदत होते. पिण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि जेवणापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
डासांपासून संरक्षणासाठी नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत आणि आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. घरातील व परिसरातील साचलेले पाणी काढून टाकावे. नाल्या, गटारे आणि सांडपाण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखावी. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच पाणी साचेल अशा वस्तू उघड्यावर ठेवणे टाळावे. साथरोगांचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता व जनजागृती मोहिमांना नागरिकांनी सहकार्य करावे.
जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. मोबिन खान म्हणाले की, प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता सुरक्षित पाणी, डास नियंत्रण आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी या बाबींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या कुटुंबासह परिसराचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे.