buldhana Cattle Fodder Management
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाणे वाटपासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना चारा पिकांकडे वळवून संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध होणे, वेळेत पेरणी होणे आणि चारा पिकांना आवश्यक पाणी मिळणे या बाबींवर योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता दररोज ३ हजार ४३३ मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासते. ऑक्टोबर ते जून ५२ या कालावधीतील एकूण गरज ९ लाख २६ हजार ७२० मेट्रिक टन असल्याचे नियोजनात नमूद आहे. उपलब्ध चारा आणि अपेक्षित उत्पादनाचा विचार करता जून २०२७ अखेर १ लाख ५२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी चारा उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलप्रकल्पांच्या परिसरातील उपलब्ध जमिनीचा वापर करण्यासोबतच शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांना बाहेरून चारा खरेदी करावा लागू शकतो. परिणामी, पशुपालनाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. योजनेच्या अंमलबजावणीत बियाणे वेळेत उपलब्ध करून देणे, लाभाथ्यांची निवड आणि लागवड क्षेत्राचा योग्य वापर या बाबींना महत्त्व राहणार आहे.
चारा उत्पादन वाढल्यास पशुपालकांना दिलासा मिळण्याबरोबरच लागवड, देखभाल आणि काढणीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तथापी, पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा यासाठी प्रशासनाने नियोजनासोबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही लक्ष देण्याची गरज आहे. संभाव्य तूट लक्षात घेता चारा उत्पादन वाढविणे आणि उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणारआहे.
नियोजनानुसार खडकपूर्णा प्रकल्प परिसरात सर्वाधिक १ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड प्रस्तावित आहे. पेनटाकळी येथे ४५० हेक्टर, नळगंगा येथे ३७५ हेक्टर, ज्ञानगंगा येथे १५५ हेक्टर, कोराडी येथे १२० हेक्टर, पलढग येथे ६० हेक्टर, मन येथे ४८ हेक्टर आणि तोरणा येथे ६६ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.
चाराटंचाई रोखण्यासाठी नियोजनाची कसोटी चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष उत्पादन किती होते, यावरच संभाव्य टंचाईची तीव्रता अवलंबून राहणार आहे. पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी, बियाणे वाटप आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद या बाबी निर्णायक ठरतील.
चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. या निधीतून चारा बियाणे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. पात्र पशुपालकांना बियाणे मिळाल्यानंतर चारा पिकांची लागवड वाढण्यास मदत होऊ शकते. जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेनटाकळी, नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मन आणि तोरणा या आठ जलप्रकल्पांच्या परिसरातील गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या ८ प्रकल्पांच्या परिसरातील एकूण २ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचा चारा उत्पादनासाठी वापर केला जाणार आहे. यामुळे चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.






