गेल्या काही वर्षांपासून अॅड गुणवरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला आणि पुन्हा एकदा प्रसारमध्यमांच्या केंद्रस्थानी ॲड. गुणरत्न सदावर्ते आले. सदावर्ते यांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अवस्थेला शरद पवार हेच जबादार असल्याची टीका त्यांनी अनेकवेळा केली आहे.
कोण आहेत ॲड. गुणरत्न सदावर्ते
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते.पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईत वकिली करू लागले. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली होती. तेव्हा सदावर्ते हे प्रकाशझोतात आले होते. ॲड. जयश्री पाटील यांनी ती याचिका दाखल केली होती. ॲड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आणि हे आरक्षण असंवैधानिक असल्याचे त्याचे मत आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये काम केले आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेवरती पीएचडी केली आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नाच्या याचिकेची बाजू न्यायालायात मांडली आहे.
ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. पुढे या आंदोलनात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला व आंदोनाचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आले. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. गुरुवारी उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेत कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसेच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, निवृत्ती वेतन देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
मुलीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
२२ ऑगस्ट २०१८ रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी १० वर्षाच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.