राधाकृष्णन यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा का नाही? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar On CP Radhakrushnan: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन केला होता, पण आम्ही पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हेमंत सोरेन यांना ज्यावेळी रांचीच्या राजभवनात अटक करण्यात आली, त्यावेळी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. सोरेन यांनी आपल्याला राजभवनात अटक न करण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही त्यांना राजभवनातच अटक कऱण्यात आली. त्यामुळेच आम्ही राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नाही, असं कारणही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आयोगावर निशाणा साधला. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही वक्तव्य केले. इंडिया आघाडीकडे मतांची संख्या जास्त आहे. पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमची ताकद किती आहे, याबाबत आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे मते कमी असले तरी आम्ही नुसते उद्योग करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांविरोधात आम्ही ३०० खासदार रस्त्यावर उतरलो, पण तिथेही आमच्या खासदारांना अटक करण्यात आली. पण आता आम्हीही मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केला आहे. पण बिहार हे राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यात शुन्य हाऊस नंबर आहे, डॅश असलेली शेकडो घरे आहेत, उद्गारवाचक चिन्ह, डॉट असलेले, ब्लॅंक हाऊसनंबर असलेली, तीस-तीस, चाळीस-चाळीस हजार घरे अशी आहेत. त्यामुळे एका घरात १८८ नावे २०० नावे आहेत. यातही ०० ही एक कॅटेगिरी, ००० ही एक कॅटेगिरी आहे. कॉम्प्युटरमध्ये काहीतरी फिल करायचं म्हणून तिथे डॉट, कॉमा सारखी चिन्हे वापरली गेली आहे.
आमचे अशोक पवार यांनी निवडणुकीपूर्वी १० दिवस आधी कलेक्टरला सांगितलं होत. त्यांच्या मतदारसंघात बरीच नावनोंदणी सुरू आह. त्यातील अनेक नावे बोगस आहेत. तर आता आम्ही काहीच करून शकत नाही, असं कलेक्टरने त्यांना सांगितलं होत.त्यावर कारवाई करण्यास वेळ नाही. पण निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव घुसडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानेच केली आहे. आता एकाच घरात १६४-1१८८ मते आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, १८ ऑक्टोबर २०२४ला आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं होत. आणि पत्रकार परिषदही घेतली होती. तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस शिवसेनेचे, मतदार आहेत, ते १०-१० हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत. त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला१८ ऑक्टोबर २०२४ला दिले होते. मतदार याद्यांमध्ये घोळ कऱण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ हजार मतदारांमध्ये हा घोळ सुरू आहे. ही तक्रार आम्ही निवडणुकीच्या नंतर नाही तर आधीच केली होती.