संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना सतत घडत आहेत. अपहरण आणि मारहाण यासारखेही गुन्हे उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला, तिची सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचं गेल्या काही महिन्यांपासून विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब पुरुषाच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर वारंवार वाद घडत होते. तरीही पती आणि प्रेयसी एकमेकांना भेटत होते. अखेर बुधवारी सायंकाळी पतीची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मोठा प्लॅन केला.
कुरिअरच्या बहाण्याने बाहेर बोलावलं
पीडित तरुणी काम करत असलेल्या आयटी कंपनीच्या कार्यालयाबाहेर फोन करून, “तुमचं कुरिअर आलं आहे” असा बहाणा करत तिला बाहेर बोलावण्यात आलं. ती बाहेर येताच पत्नी, सासू आणि मेहुण्याने तिला वाहनात बसवून नेलं. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मध्यस्थी करणार्या ज्येष्ठावर हत्याराने वार
घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला येरवड्यातील यशवंतनगर येथील डायमंड चौक येथे तीन ते चार जण आपआपसात वाद घालत असताना दिसले. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यावरच धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमन अनिल भालेराव (रा. यशवंतनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश रामचंद्र साबळे (६३, रा. डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.