सौजन्य - नवराष्ट्र टीम
इस्लामपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहीत पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर इस्लामपूर शहरात प्रथमच एका व्यासपीठावर आले. इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे नेते एकत्र आले होते. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाच्या संयोजक सरोज पाटील या शरद पवार यांच्या जेष्ठ भगिनी व अजित पवारांच्या आत्या आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्रीत आलेल्या अजित पवार व रोहित पवार या काका पुतण्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, पवार काका पुतण्याच्या राजकीय जुगलबंदीने राजकीय वातावरण गरम झाले.
कार्यक्रमात भाषण करताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगत सुरुवातीला त्यांना चिमटा काढला. “काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र पक्षात असताना मी अधिवेशनात भाषण करताना कसा उभा राहतो, माझ्या शर्टची बटणं कशी असतात, याकडे अजित पवारांचं त्याकाळी बारकाईने माझ्यावर लक्ष होतं. आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला कुठेतरी विसरले आहेत,” असं रोहित पवार म्हणाले होते. रोहित पवारांच्या या टोमण्याला अजित पवारांनी नंतर आपल्या खास रोखठोक शैलीत उत्तर दिलं.
जुगलबंदीत अजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलने ” माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको असा दम भरला. “दादाचं गावकीकडं लक्ष आहे, जरा भावकीकडंही लक्ष द्या. अरं भावकीकडं लक्ष दिलं; म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा, किती मतं पडली आहेत, पोस्टल बॅलेटवर आला आहात आपण असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. जयंतराव, मी जेव्हापासून महायुतीसोबत गेलो आहे, तेव्हापासून मी तुमच्या कोणावर कधी टिकाटिपण्णी केली आहे का? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चालला आहात, मी माझ्या विचाराने चाललो आहे.
शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासच साध्य करायचा आहे. आम्ही शाहू-फुले- आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही. व्यासपीठावरील सर्वांची भाषण होत होती, तसं माझं सणकत चाललं होतं. मला रोहितने सांगितलं की, जयंतरावाचं बारा वाजता हेलिकॉप्टर आहे, मला त्यातून जायचं आहे. मी म्हटलं आर्रऽऽ र्रऽ, माझं भाषण ऐकायला नेमकं हे दोघे नाहीत. मी काय बोलायचं हे ठरवलं होतं. पण हे बोलून निघून गेले, परंतु ते परत आले. माझं नशीब लय चांगलं आहे, कसं का होईना ते जुळूनच येतंय.
जयंत पाटील यांच्या आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं व्यक्तीमत्व आहे, असा उल्लेख निवेदकानी केला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले,” जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणं नाही का? असे म्हणताच एकच हशा पिकला. कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची” या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नेते खळखळून हसले.
अजित पवार म्हणाले, मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे आम्ही १९९९ पर्यंत ज्युनिअरच होतो. १९९९ मध्ये सरकार स्थापनेच्या वेळी खूप दिवस असेच वाया चालले होते. त्यावेळी काय करायचे म्हणून आम्ही चौघे मेट्रो स्टेशनजवळील चित्रपटगृहात जाऊन कुठलातरी चित्रपट बघितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जसं सांगतील तसं आपण करायचं, असं आम्ही ठरवलं होतं. १९९०, १९९५ आणि १९९९ अशा तीन टर्म आमच्या झाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये आमची कुठं विचारपूस करायला लागले हेाते. पण काही जणांना वाटतं की, पहिल्या टर्मलाच आपण मोठं झालं पाहिजे. मी भाषण केलं पाहिजे, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले, मी माझ्या पक्षाचे काम करतो, जयंतराव पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात. पण माझ्या पक्षात मी काय करावं, याचे दुसरेच सल्ले देऊ लागले आहेत. मला तर काहींचं कळतंच नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळे माझ्या कोणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी एक अक्षर बोलणार नाही.
आमचा प्राब्लेमही आणि स्वाभिमानाचे केंद्रही..!
लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकाराने करायची, हे एन. डी. पाटील यांनी दाखवून दिले आहे. हा या तालुक्याचा आदर्श आहे. हा आमच्या वाळवा तालुक्याचा प्राब्लेमही आहे. सहजासहजी हा तालुका वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहेत, त्यांना सोबत घेऊन लढायचं, हे एन.डी. पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवले आहे. हा आमचा प्राब्लेमही आहे आणि आमच्या स्वाभिमानाचे केंद्रही आहे. असं जयंत पाटील म्हणाले.