सातारा : सातारा जिल्ह्यातील विकासकामे आम्ही लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार सुचवित असतो. या कामांची अनावश्यक अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची पर्वा केली जाणार नाही. लोकांच्या हितासाठी असणारी विकासकामे वेळेत मार्गी लागायला हवीत, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा संधारण अधिकारी, लेखा अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे, विभाग सिंचन विभागाचे सर्व अभियंता यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले विकास कामे ही लोकांच्या गरजेप्रमाणे आणि मागणीनुसार सुचवली जातात ती कामे कोणता प्रशासकीय अधिकारी करतो हे महत्त्वाचे नाही सुचवलेली विकास कामे ही वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत या कामांमध्ये अनावश्यक अडवणूक करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांचा अजिबात मुलाहिजा ठेवला जाणार नाही लोकहिताची कामे मार्गी लागली पाहिजेत असा सज्जड इशारा उदयनराजे यांनी बैठकीत दिला
प्रशासकीय यंत्रणांनी केवळ कामाच्या काही तांत्रिक समस्या असतील अशी कामे सोडून तातडीने प्रस्तावित कामे करणे अपेक्षित आहे परंतु काही वेळा कामे कोणी सुचविली यावरून प्रशासकीय यंत्रणा कामांच्या नस्ती हाताळत असतात ही बाब प्रशासन विभागाला शोभणार नाही अशा मानसिकतेमुळे अंतिमतः समाजाचे मोठे नुकसान होत असते लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या कामांबाबत त्या-त्या प्रशासक विभागांनी आपली जबाबदारी पूर्ण करून कामांना गती द्यावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या या बैठकीचे प्रास्ताविक आणि स्वागत बाळासाहेब ननावरे यांनी केले तर सुनील काटकर यांनी आभार मानले