पीडितेची ओळख उघड केल्याने महिला आयोगावर टीकेची झोडपट; रोहित पवारांचा आरोप
Mumbai News: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्रकार परिषद घेतल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, आयोगाकडे प्राप्त अहवालानुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे तसेच मानवी तस्करीची माहिती मिळाल्याचे सांगितले. पण अशा पद्धतीने ही माहिती सार्वजनिक करण्याचा चाकणकर यांना अधिकार नसून, हे व्यक्तीगत गुप्ततेच्या (Right to Privacy) हक्काचे उल्लंघन असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही चाकणकरांवर पलटवार केला आहे. त्यांनी ट्विट करून, पीडित मुलीची ओळख उघड केल्याने बीएनएस कलम ७२ नुसार गंभीर गुन्हा झाल्याचा आरोप केला आहे. पुण्यातील कोथरुडमधील दलित मुलींवर पोलिसांकडून झालेल्या शेरेबाजीप्रकरणी चाकणकरांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, मात्र प्रांजल खेवलकर प्रकरणात गोपनीय माहिती जाहीर करून कायद्याचे उल्लंघन केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हटलं आहे रोहित पवारांनी ट्विटमध्ये?
“महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या राज्य महिला आयोगाने अजून एक नवीन प्रताप केला आहे. कोथरूडमधील ज्या मुलींवर पोलिसांनी अश्लील व जातीवाचक शेरेबाजी केली त्यांच्या घरात चुकीच्या पद्धतीने घुसून बेकायदेशीर झाडाझडती घेतली. त्या मुलींची ओळख व नाव हे आजवर सर्वांनीच गोपनीय ठेवलं होतं मात्र झोपेतून जागे झालेल्या महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये सदर मुलीचे नाव टाकले आहे. BNS S72 नुसार हा गंभीर गुन्हा आहे. अशा शब्दांत ट्विट करत रोहित पवार यांनी चाकणकरांवर टीकास्त्र डागलं आहे.
तसेच, आधीच खोटी कट कारस्थाने करून अडचणीत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे चारित्र्य हनन करून त्यांना पूर्णपणे नाऊमेद करण्याचं काम राज्य महिला आयोगानं केलं आहे आणि हेच ट्विट re-post करून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील शोषित मुलींच्या जखमेवर मीठ चोळलं. अशा या बेजबाबदार व संवेदनाहीन वागणुकीबाबत सरकारने तत्काळ महिला आयोगावर कारवाई करावी.” अशी मागणीही त्यांनी केली आहेत. रोहित पवार यांच्या या टिकेनंतर सध्या तरी महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आयोगाकडून याबाबत अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
Cyber Fraud : ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम पडलं महागात; सायबर चोरट्यांकडून ९ कोटींची फसवणूक
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवर सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंच्या जावयासंदर्भातील प्रश्नावर भूमिका मांडताना सुळे म्हणाल्या की, रोहिणी खडसेंच्या पतीचा पक्षाशी काहीही संबंध नाही. राईट टू प्रायव्हसी हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल दुसऱ्या कोणालाही दाखवायचा नसतो. “उद्या तुमचा मोबाईल घेतला, तर तो फक्त पोलीस यंत्रणा आणि न्यायालयालाच दाखवला जावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे,” असे सुळे म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी या कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.