T20 World Cup 2026 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026 practice match schedule : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केलेला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सर्व सहभागी संघ आता या स्पर्धेच्या तयारीत चांगलेच दंग असल्याचे दिसत आहेत. संघांना स्पर्धेशी जुळवून घेण्यास आणि विश्वचषकापूर्वी त्यांच्या फॉर्मची चाचणीपणी घेण्यासाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या सामन्यांमुळे संघांना त्यांच्या खेळाडूंची तंदुरुस्ती आणि रणनीती तपासण्याची संधी मिळणार आहे.
टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा एकच सराव सामना होणार आहे. भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत अ संघ दोन सामने खेळणार आहे. भारत अ संघ २ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल. त्यानंतर, भारत अ संघ ६ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
जगातील सोळा संघ भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी तयारी करत असून त्यांचे ध्येय प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकणे असणार आहे. हा प्रमुख क्रिकेट कार्निव्हल ७ फेब्रुवारी रोजी तीन ठिकाणी सुरू होईल, ज्याचा अंतिम सामना ८ मार्च रोजी होणार आहे.






