जळगावमध्ये शेतामध्ये वीज पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला (फोटो - istock)
जळगाव : राज्यामध्ये सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकावर देखील या अवकाळी पावसामुळे विपरित परिणाम होत आहे. जळगावमध्ये या अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
जळगाव जिल्ह्यात काल (दि.31) सोमवारपासून ढगाळ वातावरण कायम आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळीच्या पावसाचा शिडकावा झाला. तालुक्यातील धानवड येथे आजोबांसह पिकांची राखण करण्यासाठी शेतात गेलेल्या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये मृताचे आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश विलास राठोड (वय 15) असे मृत युवकाचे नाव आहे. जखमी आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय 65) असे नाव असून ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खान्देशात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. काल सोमवारपासूनच ढगाळ वातवरण कायम आहे. जळगाव जिल्ह्यात काल सोमवारी रात्री अनेक भागात वादळी वाऱ्यांसह वीजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी दिली. अवकाळी पावसाचा जोर नसला तरी वादळी वाऱ्यांनी जळगाव तालुक्याला झोडपले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धानवड (ता. जळगाव) येथील अंकुश विलास राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी जगराम राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड गंभीरीत्या भाजले गेलेत. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन मृत मुलाच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून हवामानात कमालीची बदल जाणवत आहे. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.