सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेत. सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिनय बेर्डेसुद्धा (Abhinay Berde) त्याला अपवाद नाही. मी देखील बाप्पाचा ‘नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं (Ganesh Stuti) पहिलंच धमाकेदार गाणं ‘बाप्पा माझा १ नंबर’ मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे.
नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस १५’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ताल धरायला लावणाऱ्या ‘बाप्पा माझा १ नंबर’ (Bappa Majha Ek Number) या गाण्यावर अभिनयचा जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. प्रत्येकाला थिरकायला लावतील असे या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत या दोन्ही बाजू शोर यांनी सांभाळल्या आहेत. देव नेगी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. राहुल आणि संजीव यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. साऊंड प्रोड्यूसर सुदेश सावंत आहेत. संगीताचे हक्क टिप्स कंपनीकडे आहेत.
या गाण्याबद्दल बोलताना अभिनय सांगतो की, ‘बाप्पाचं आगमन’ सगळयांनाच आनंद देणार असतं. हाच आनंद आणि उत्साह तुम्हाला या गाण्यात पहायला मिळेल. मला स्वत:ला गणपतीच हे गाणं करताना खूप मजा आली. ‘बाप्पा’ हा सर्वांसाठीच नंबर वन’ असतो. यंदाच्या गणपतीत हे गाणं कल्ला करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.
[read_also content=”जिओ स्टुडिओजची पहिली मराठी वेबसीरिज ‘एका काळेचे मणी’ https://www.navarashtra.com/entertainment/eka-kaleche-mani-web-series-to-be-released-by-jio-studios-nrsr-319415/”]
या चित्रपटाचे लेखन,दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे.