अभिषेक बच्चनचे मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल!
अभिषेक बच्चनचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेमुळे इतिहासातील महत्त्वाचा पण कमी चर्चेत असलेला भाग प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या फर्स्ट लूक टीझरमध्ये अभिषेक बच्चन एका प्रभावी आणि वेगळ्या अवतारात दिसला. योद्ध्याचा साज, रणांगणातील दमदार उपस्थिती आणि भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटात युद्धासोबतच भावना, नातेसंबंध आणि इतिहासाचा भव्य पट उलगडला जाणार असल्याचे दिसते.
आपल्या मराठी डेब्यूबाबत बोलताना अभिषेक बच्चनने रितेश विलासराव देशमुख यांच्याशी असलेली २५ वर्षांची मैत्री नमूद केली. ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती, त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, रितेश देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून होते आणि त्यांनी ते सातत्याने जपले. दिग्दर्शक म्हणून ही त्यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना आता साकार होत आहे.
EV Market आमच्या घरचं! Mahindra आणि MG ला समजलंच नाही आणि ‘ही’ कंपनी पोहोचली सर्वोच्च शिखरावर
३१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या टीझरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. भव्य दृश्यरचना, ॲक्शन आणि ऐतिहासिक वातावरणामुळे प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे. चित्रपटाला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे, तर संतोष सिवन यांनी उत्कृष्ट छायांकन केले आहे.
या चित्रपटात संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट जिओ स्टुडिओज सादर करत असून ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






