अभिनेता विवेक सांगळे कसा आला अभिनय क्षेत्रात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘लव्ह लग्न लोचा’, ‘भाग्य तू दिले मला’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमधून आपलासा झालेला विवेक सांगळे अनेक तरूणींच्या हृदयातला ताईत आहे. पण विवेक नक्की या क्षेत्रात कसा आला तुम्हाला माहीत आहे का? खरं तर विवेकने हा मजेशीर किस्सा आमच्याशी शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांनाही हा किस्सा वाचायला मजा येईल यात काहीच शंका नाही.
त्याचा हा मजेशीर किस्सा वाचायला तुम्हीही उत्सुक आहात ना? विवेक या क्षेत्रात आला त्याची एक कहाणीच आहे आणि विवेकने स्वतः याबाबत खुलासा केलाय. शिवाजी विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किर्ती कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विवेकने कधीही शाळेत वा कॉलेजमध्ये अभिनयाचे काम केले नव्हते आणि हे तुम्ही वाचून नक्कीच म्हणाल की काहीही काय? आम्ही खोटं बोलत असल्यासारखं तुम्हाला वाटेल. पण हेच खरं आहे. वाचा विवेकची अभिनयाची सुरूवात कशी आणि कुठून झाली…
अभिनयाचा ‘अ’देखील नाही ठाऊक
विवेकचा अभिनयक्षेत्राशी तसा तर काहीही संबंध नव्हता. लालबागला राहणाऱ्या विवेकचा इंजिनिअरिंगकडे प्रवास चालू होता. पण एकदा मित्राबरोबर त्याच्या बहिणीच्या घरी विवेक सहजच गेला होता आणि तिथेच त्याच्या नशिबाचे फासे फिरले असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
त्याच्या मित्राची बहीण हात बघून भविष्य सांगायची आणि विवेकनेही मजा म्हणून हात दाखवला होता. तेव्हा ती त्याला म्हणाली, ‘अरे तू Acting का करत नाहीस?’ त्यावर विवेकची काहीच प्रतिक्रिया नव्हती. कारण त्याला हे सगळं वेगळंच वाटलं. कधीच अभिनय केलेल्या विवेकने हे सर्वच हसण्यावारी नेलं होतं.
Exclusive: ‘मालिकेचे श्रेय लेखकालाच’, महाराष्ट्राचा लाडका ‘जीवा’ विवेक सांगळेचे स्पष्ट मत
अचानक डोक्यात विचार सुरू…
मात्र या दिवसानंतर काही दिवसांनी विवेकच्या डोक्यात अचानकच अभिनयाचे विचार चालू झाले. का आणि कसं हे त्यालाही माहीत नाही. त्यानंतर त्याने अभिनयाचा व्यवस्थित कोर्स केला आणि अभिनय हा आपल्या करिअरचा पर्याय असू शकतो याचा गंभीरपणे विचार करायला सुरूवात केला. या सगळ्यानंतर रांगेत उभं राहून ऑडिशन देणे, प्रोफाईल बनवणे आणि अगदी एक-एक वाक्याच्या भूमिका करणे इथपासून त्याने स्ट्रगल केला असल्याचे सांगितले.
Diction वर केले काम
विवेक इतका प्रामाणिक आहे की, त्याने आमच्याशी बोलताना त्याचा सर्व अनुभव अगदी सहज शेअर केला. अभिनयाचे धडे गिरवताना आपले उच्चार स्पष्ट असायला हवेत हे त्याला काही लोकांकडून कळू लागले होते आणि त्याने कोणताही न्यूनगंड न बाळगता त्यावर काम करायचे ठरवले. त्यासाठी त्याने Diction क्लासदेखील लावला आणि आपल्या भाषेवर, त्याच्या उच्चारावर काम करत त्याने आज सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
आता विवेकचा अभिनय पाहता त्याने लहानपणापासून कधीच अभिनय केला नव्हता असं कोणाला वाटणारही नाही आणि त्याशिवाय त्याचे भाषेवरील प्रभुत्वदेखील तितकेच उल्लेखनीय आहे हे मात्र नक्की!