(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
15 मे 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करण्यासाठी सज्ज असलेला ‘आखरी सवाल’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती नीम ट्री एंटरटेनमेंट आणि निखिल नंदा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. निखिल नंदा, धनराज नथवानी आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, दमदार स्टारकास्टमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘आखरी सवाल’मध्ये संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या अनुभवी कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला एक वेगळंच वजन प्राप्त झालं आहे. संजय दत्त यांच्या लूकने आणि त्यांच्या गंभीर व्यक्तिमत्त्वाने आधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला नवा पोस्टरही प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा ठरला आहे. या पोस्टरमध्ये मोठ्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त यांचा गंभीर चेहरा दिसून येतो, जो चित्रपटाच्या गूढ आणि विचारप्रवर्तक विषयाची झलक देतो. “तो प्रश्न जो भारताने कधी विचारणं थांबवलं नाही” ही टॅगलाइन चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.
‘आखरी सवाल’ हा चित्रपट भारतातील सर्वात जुन्या आणि संघटित संस्थांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित आहे. १९२५ साली केशव बलिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर आणि एका निर्णायक बैठकीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. राष्ट्रासाठी निस्वार्थ सेवाभाव, विचारधारा आणि त्यामागील अनकथित गोष्टी प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.
दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी 2021 साली ‘पिकासो’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांना 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख (स्पेशल मेंशन) मिळाला होता. त्यांच्या दिग्दर्शनशैलीत आशयघनता आणि वास्तववादी मांडणी दिसून येते, त्यामुळे ‘आखरी सवाल’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. एकंदरितच दमदार स्टारकास्ट, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रभावी मांडणीमुळे ‘आखरी सवाल’ हा चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव पाडेल, अशी जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.






