बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर संजय गुप्ता यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये संजय गुप्ता यांना जवळचा मित्र आणि उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याचे म्हटले आहे. संजय गुप्ता हे नेहमी उत्साही असणारे, उत्तम कथा सांगणारे आणि चित्रपट निर्मितीबद्दल प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत अशोक पंडित यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून तपास सुरू केला आहे.
संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी ‘राम शास्त्र’, ‘हमेशा’, ‘जंग’ आणि ‘खौफ’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कांटे’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि लकी अली यांसारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली.
संजय गुप्ता आणि अभिनेता संजय दत्त यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष लोकप्रिय होती. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘मुसाफिर’, ‘जिंदा’ आणि ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमुळे ही जोडी चर्चेत राहिली. याशिवाय त्यांनी ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. विशेषतः हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
संजय गुप्ता यांनी केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर निर्माता आणि पटकथालेखक म्हणूनही चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. ‘दस कहानियां’, ‘प्लान’, ‘वुडस्टॉक व्हिला’, ‘अॅसिड फॅक्टरी’ आणि ‘पंख’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते. अॅक्शन, गुन्हेगारी विश्व आणि थरारक कथानकांची मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची खास ओळख होती. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका वेगळ्या शैलीच्या दिग्दर्शकाला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Ans: संजय गुप्ता हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक होते. 'कांटे', 'काबिल', 'शूटआउट अॅट वडाळा' आणि 'मुंबई सागा' यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जात होते.
Ans: संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ans: १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला 'आतिश : फील द फायर' हा संजय गुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली मुख्य भूमिकेत होते.






