फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित चित्रपटाचे फक्त देशातच नाही तर, परदेशातही हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहे. चित्रपटाने फक्त तीन दिवसांतच १०० कोटींचा टप्पा गाठत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. याचदरम्यान, ‘छावा’चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री व्हावा, अशी मागणी आता युवासेनेकडून करण्यात येत आहे.
विकी कौशल दिग्दर्शित ‘छावा’चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री व्हावा, अशी मागणी आता युवासेनेकडून करण्यात येत आहे. यासाठी युवासेना ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, तसेच कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष युवासेना ऋषिकेश माने यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेनेचे पदाधिकारी विनोद अवताडे, मृणाल सुशांत मोरे, धीरज पाटील, सुशांत शेलार, रुपेश मिश्रा, तुषार अवले, विकास मोरे आणि अन्य पदाधिकारी होते.
यासोबतच अहिल्यानगरमधील प्रत्येक सर्वसामान्य महिलेला ‘छावा’चित्रपट पाहता यावा यासाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनीही चित्रपटाचे काही शोज मोफत आयोजित केले आहेत. अहिल्यानगरमधील महिलांसाठी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अनुभवावा, यासाठी त्यांनी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत. “छावा चित्रपटाचे शो १७ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी ३:३० वाजता) आयोजित करण्यात आले आहेत.” अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरातल्या कमाईमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत तब्बल १२१ कोटींचा गल्ला जमावला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.