‘स्पेशल ऑप्स’ वेब सिरीजमधील एजंट अविनाशची दमदार भूमिका साकारणारे अभिनेता मुझम्मिल इब्राहिम यांनी अलीकडेच या भूमिकेच्या प्रवासाबद्दल आणि दिग्दर्शक नीरज पांडे यांच्याशी असलेल्या जवळच्या नात्याबद्दल खुलासा केला.
भूमिका मिळण्याबद्दल बोलताना मुझम्मिल म्हणाले, “मला ‘स्पेशल ऑप्स’ साठी निवडण्यात आले कारण टीमने माझे आधीचे प्रोजेक्ट्स पाहिले होते आणि माझ्या कामाची ओळख होती. मला ‘धोखा’ चित्रपटात पाहिले होते आणि माझ्या अभिनयाला पसंती दिली होती. आम्ही पूर्वी एका चित्रपटासाठी एकत्र काम करणार होतो, पण ते शक्य झाले नाही. ते नेहमीच टॅलेंटला सपोर्ट करतात. माझे ऑडिशन झाल्यावर मी या भूमिकेसाठी पहिली पसंत ठरलो.”
नीरज पांडे यांच्याशी नातं दुसऱ्या सीझनदरम्यान अधिक घट्ट झाल्याचं ते सांगतात. “नीरज सर फारसे बोलत नाहीत आणि थेट कौतुकही कमीच करतात. पण ‘सीझन 2’ च्या शूटिंगदरम्यान त्यांनी मला सांगितले की माझी भूमिका त्यांनी वाढवली कारण माझ्या पात्राबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे माझी स्क्रीनवरची उपस्थिती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘स्पेशल ऑप्स 2’ नंतर मला आशा आहे की आणखी चांगला प्रतिसाद मिळाला असेल आणि फॅन्सच्या अपेक्षेनुसार माझ्या पात्राबद्दल पुढे आणखी काही रोमांचक घडेल.”
नीरज पांडे यांच्याशी असलेल्या नात्याचे वर्णन करताना मुझम्मिल यांनी त्यांना गुरु-शिष्य नात्यासारखे मानले आहे. “ते असे व्यक्ती आहेत की ज्यांना मी कधीही सल्ल्यासाठी फोन करू शकतो, अगदी मोठ्या भावासारखे. ते अतिशय प्रामाणिक आहेत आणि मी त्यांना माणूस व प्रोफेशनल म्हणून खूप मानतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आम्ही सगळेच त्यांचे फॅन आहोत—खरं सांगायचं तर ते माझ्यासाठी ‘मॅन क्रश’सारखे आहेत.”
ते पुढे म्हणाले, “इतक्या यशानंतरही नीरज सरांमध्ये अजिबात अहंकार नाही, ते कधीच वेगळा आव आणत नाहीत किंवा रौब दाखवत नाहीत. त्यांच्या सेटवर कोणत्याही प्रकारचे राजकारण टिकत नाही आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांनाच जातं. त्यांच्या टीममध्ये काम करणं ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभूती आहे.” मुझम्मिलच्या मते, ‘स्पेशल ऑप्स’ हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे आणि नीरज पांडे यांसारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली काम करणं ही त्याच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी संधी आहे. त्यांना आशा आहे की भविष्यातही ही जोडी एकत्रितपणे प्रेक्षकांसाठी आणखी दमदार आणि प्रभावी कंटेंट घेऊन येईल.