डहाणूत अवैध खैर तोडीचा साठा जप्त
गुप्त माहितीवर वनविभागाची धडक कारवाई
दीड लाखांचा माल जप्त, तपास सुरु
पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत वनसंपत्तीचे संरक्षण करण्याचा चोख ‘धडा’ दिला आहे. डहाणू वनपरिक्षेत्र उधवा आणि धानिवरी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात धडक कारवाई करत अवैध खैर जातीच्या लाकडाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे
सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई–अहमदाबाद हायवेलगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात मोठ्या प्रमाणात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली असल्याचे समोर आले. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संपूर्ण पथकासह त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली.
साठा जप्त
या शोधमोहीमेदरम्यान अंदाजे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा मिळाला. हा साठा जवळपास तीन पिकअप वाहनांच्या क्षमतेइतका मोठा होता. या लाकडाचा संपूर्ण माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय काष्ठविक्री आगर, भराड येथे जमा करण्यात आला आहे.
या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर, वनपाल विजय पाटील व योगेश कुलकर्णी तसेच वनरक्षक संजू भुसारा, सुनील पवार, प्रवीण व दिनेश वाळू, किरण विल्हात, गुरुनाथ गांगोडे, राजेश बोबा, भिवा दळवी, लक्षी गोरखाना, लक्ष्मण थोरात, बंधु पराड, लक्ष्मण दळवी, कान्हा वेडगा आणि राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईनंतर वनविभागाकडून या अवैध खैर साठ्याचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा साठा नेमका कोठून आणला गेला आणि कोणा कडून साठवला गेला, याची चौकशी सध्या सुरु आहे.
वन विभागाच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना मोठा धडा मिळाला असून, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विभागाच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. वनसंपत्तीचे रक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनविभागाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ही कारवाई भविष्यात अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर प्रतिबंध घालण्यास निश्चितच मदत करेल.






