सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचं 7 फेब्रुवारीला लग्न होणार आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी सिद्धार्थ-कियाराने अनेक सेलिब्रिटींना बोलावलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत.
सिद्धार्थ-कियाराच्या ग्रँड वेडिंगसाठी अंबानी कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी तिचा पती आनंद परिमल, आकाश अंबानी व पत्नी श्लोका मेहतासह सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानला पोहोचले आहेत. ईशा अंबानी आणि कियारा लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. ईशा आणि तिच्या नवऱ्याचे एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्यात अंबानी कुटुंबियांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या संगीत, मेहेंदी व हळदी कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सिद्धार्थ-कियारा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. शेरशाह चित्रपटातील त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता हे रील लाइफ कपल खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.
पॅलेसचं भाडं
सिद्धार्थ – कियारा जैसलमेरच्या ज्या सूर्य पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत ते पॅलेस डोंगरामध्ये वसलेले आहे. साधारण 4 एकर जागेत तयार करण्यात आलेल्या या पॅलेसमध्ये 90 खोल्या आहेत. या पॅलेसचं भाडं 12 हजार रुपयांपासून सुरु होतं आणि सुविधांनुसार हा दर वाढत जातो. लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी इथे एका दिवसाचं भाडं साधारण 1-2 कोटी रुपये आहे.हे हॉटेल एक आलिशान महालासारखं आहे. इथलं फर्निचर सागवान आणि चंदनाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. इथे स्विमिंग पूल, जिम , बार अशा अनेक सुविधा आहेत.
ग्रँड रिसेप्शन
लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात शाहिद कपूर, मीरा कपूर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, अश्विनी यार्डी, वरुण धवन, कॅटरीना कैफ, अक्षय कुमार असे अनेक सेलिब्रिटी, सिद्धार्थ कियाराचे नातेवाईक आणि मित्र परिवार या लग्नासाठी उपस्थित राहतील.