(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी रंगभूमीवरील एक अजरामर आणि सुपरहिट ठरलेले ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक गेली तीन दशकं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. ३१ डिसेंबर १९९३ रोजी लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी या नाटकाचा पहिला प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात सादर केला आणि तेव्हापासून या नाटकाच्या यशाचा प्रवास अविरत सुरू आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हाऊसफुल्ल प्रयोगांची मालिका सुरू झाली.
या नाटकाच्या पहिल्या टीममध्ये भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः रंगभूमी गाजवली. त्यांच्या परफॉर्मन्समुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि नाटकाला अभूतपूर्व यश मिळाले. पुढे श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे आणि दीपा परब या कलाकारांनी दुसऱ्या टीममधून ही परंपरा पुढे चालवली आणि तेही प्रेक्षकांच्या मनात घर करून सुपरस्टार बनले आहेत.
अथिया शेट्टीने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस; केएल राहुलसोबत लेक इवाराची क्यूट झलक
या नाटकाच्या यशाची व्याप्ती इतकी मोठी आहे की आजपर्यंत जवळपास २५ वेगवेगळ्या टीम्स या नाटकात काम करून गेल्या आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ने ५००० प्रयोगांच्या उंबरठ्याजवळ पोहोचत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. देवेंद्र पेम यांच्या अनामय प्रॉडक्शन्सतर्फे आजही हे नाटक तितक्याच उत्साहाने आणि जोमाने सादर केलं जात आहे.
सध्या नाटकाची नवीन टीम निखिल चव्हाण, जुई बेंडखळे, मयुरेश पेम आणि मनमित पेम ही देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या टीमने आपल्या ताज्या ऊर्जेने आणि उत्कृष्ट अभिनयाने ‘ऑल दि बेस्ट’ची जादू कायम ठेवली आहे. महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत असून, लंडन आणि दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणीही या नाटकाने यशस्वी दौरे केले आहेत.
३० वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू, घरी परतताना गाडी डिव्हायडरवर आदळली अन्…
विशेष म्हणजे, या नवीन टीमने अवघ्या दोन वर्षांत ३०० प्रयोगांचा टप्पा पार करण्याची किमया साधली आहे. या यशस्वी प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘ऑल दि बेस्ट’चा ३०० वा प्रयोग, जो रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. एकूणच, ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक केवळ मनोरंजनाचं साधन नसून मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचं प्रतीक बनलं आहे. तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं प्रेम मिळवत हे नाटक आजही नव्या उंची गाठत आहे, हेच त्याच्या यशाचं खरं कारण आहे.






