पॅडी कांबळे(Paddy Kamble), प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar), नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आणि विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कुर्रर्रर्रर्र’ची(Kurrr) आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या नाटकाबाबत पॅडी म्हणाला की, आजवर मी जी नाटकं केली त्यापेक्षा ‘कुर्रर्रर्रर्र’ हे खूप वेगळं नाटक आहे. आजवर जो पॅडी रसिकांनी पाहिला त्यापेक्षा खूप वेगळा पॅडी यात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत माझ्या दिसण्याला आणि असण्याला साजेशी अशी व्यक्तिरेखा असायची, पण यात एक वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा प्रसादनं माझ्यासाठी लिहीली. गोष्ट तर कमाल आहे. यापूर्वी अशा पद्धतीचं नाटक किंवा सिनेमा मी पाहिलेला किंवा कुणी सांगितल्याचं आठवत नाही. सत्य घटनेवर आधारीत हे नाटक आहे. प्रसादच्या बाबांच्या मित्राच्याबाबतील घडलेला हा किस्सा आहे.
पॅडी पुढे म्हणाला, एखादं काम करताना बऱ्याचदा लोकं एकमेकांना फार ओळखत नसतात, पण इथं आम्ही सर्व एकमेकांना ओळखणारे आहोतच, पण खूप ट्युन्डअपही आहोत. मी, विशाखा, प्रसाद, नमा आम्हा चौघांनाही एकमेकांच्या कामातील बारीकसारीक गोष्टी माहीती आहेत. प्रसादसोबत माझं हे तिसरं नाटक आहे. ज्यावेळी एखादी ॲडीशन घ्यायची असते, तेव्हा त्यानं फक्त डोळ्यानं खुणावलं, हात किंवा बोट हलवलं तरी मला ते समजतं. इतके आमचे सूर जुळले आहेत. विशाखा प्रथमच निर्मितीकडे वळली आहे. मैत्रीण पूनम जाधवसोबत विशाखानं निर्मितीची जबाबदारीही सांभाळली आहे. खरं तर आम्ही हे नाटक कोव्हिडच्या अगोदरच करणार होतो. लॅाकडाऊनमुळं थांबावं लागलं, पण नाटक बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.
तो ॲक्टरला लिबर्टी देतो
प्रसादच्या दिग्दर्शनाची गंमत सांगायची तर त्याचं दिग्दर्शन ठरलेलं नसतं ही जमेची बाजू आहे. तो ॲक्टरला लिबर्टी देतो. त्यांना मोकळीक देतो. ॲक्टर किती कम्फर्टेबल आहे ते प्रसाद पहातो. आर्टिस्टनं केलेल्या एखाद्या मुव्हमध्ये तो कम्फर्टेबल असेल आणि त्यातून त्याला हवा असलेला अर्थ जर समजत असेल, तर तो आर्टिस्टला लिबर्टी देतो. कधीही प्रेशराईज करत नाही. बऱ्याचदा दिग्दर्शकांची आरडाओरड सुरू असते, पण प्रसादचं तसं नाही. अत्यंत आनंदी वातावरणात तालीम केली जाते आणि नाटक कधी उभं राहतं ते कलाकारांना कळतही नाही. सातव्या-आठव्या दिवशीच नाटकाचा सांगाडा तयार होतो. त्यात मग लाईट, म्युझिक आणि इतर काही गोष्टींच्या दृष्टीनं बदल केले जातात. प्रसाद खांडेकर हे नाव हिंदी-गुजराती नाट्यसृष्टीत खूप पॅाप्युलर आहे. गुजराती रसिक प्रसादच्या दिग्दर्शनाच्या प्रेमात आहेत.
तेव्हाच चौघे फिक्स होतो
आम्हा सगळ्यांना एकाच धाग्यात बांधण्याचं कामही प्रसादनंच केलं आहे. त्याच्या मनात जेव्हा या नाटकाची गोष्ट आली, तेव्हा ज्या चार व्यक्तिरेखा त्याच्या डोक्यात होत्या त्या साकारण्यासाठी आम्हा चौघांचेच चेहरे त्याच्या डोळ्यांसमोर होते. लेखन-दिग्दर्शनासोबतच अभिनय करण्याची कला अंगी असल्यानं स्वत:ही तो एक व्यक्तिरेखा साकारतोय. त्यानिमित्तानं लेखक-दिग्दर्शकही सतत नाटकाच्या प्रोसेसमध्ये आणि नाटकासोबत राहतो. आयत्या वेळी काही चेंजेस करावे लागले तरी चिंता नसते. त्यामुळं या नाटकाचा हुक पॅाईंट प्रसादच आहे. ‘कुर्रर्रर्रर्र’ म्हणजे काय हे आताच सांगता येणार नाही… ‘कुर्रर्रर्रर्र’ म्हटल्यावर बाळाबद्दल आहे हे प्रथमदर्शनी जाणवतंच. मग बाळ होत नाही म्हणून आहे, की बाळाचे प्रॅाब्लेम्स आहेत, की प्रसादचं बाहेर कुठे लफडं आहे, की त्याला विवाहबाह्य संबंधांतून बाळ होणार आहे, की आणखी काय आहे हे सर्व नाटक पाहिल्यावरच समजेल.
प्रसादचा उपद्व्याप
या नाटकात मी विनोद नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, विशाखा बनलीय वंदना. आम्ही दोघेही पती-पत्नीच्या भूमिकेत आहोत. दुसरीकडं पूजा आणि अक्षर म्हणजेच नम्रता-प्रसाद ही जोडी आहे. यात मी सासऱ्याची भूमिका साकारतोय. पूजा आमची मुलगी आहे. प्रसाद जावई आहे. सासू-सासरे आणि जावई, आई-बाबा आणि मुलगी किंवा ते नवरा-बायको आणि आम्ही नवरा-बायको असे चौघांचे छान नातेसंबंध जपणारं असं हे नाटक आहे. यात माझा लुक वेगळा आहे. विग आणि मिशीही आहे. हा सर्व उपद्व्याप मी वयस्कर दिसावा यासाठी प्रसादनं केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेची रिहर्सल आणि शूटिंग सांभाळून दोन दिवस तालीम असं करत आम्ही नाटक उभं केलं आहे. हे पाहता महिन्यातील फक्त १५ दिवस आम्हाला तालिमीसाठी वेळ मिळाला.
पिळगावकरांचं अफलातून गाणं
या नाटकात आमची मुलगी असलेल्या पूजाला बाळ होणार असल्यानं डोहाळ जेवणाचा सोहळा आहे. त्यामुळं डोहाळ जेवणाचं गाणं असावं असं वाटलं. त्यासाठी काय करता येईल हा विचार करताना ‘कुणीतरी येणार येणार गं…’सारखं काहीतरी हवं हा विचार समोर आला. त्यानंतर संगीतकार अमीर हडकर आणि प्रसादच्या डोक्यात सचिन पिळगांवकरांकडून एक हुकलाईन गाऊन घेण्याचा विचार आला. त्यासाठी मी सचिन सरांना फोन केला आणि म्हणालो की, सर तुमच्याकडून फक्त दोन ओळी गाऊन घ्यायच्या आहेत. त्यावर ते म्हणाले की, जर तुमच्याकडे पहाड येतोच आहे, तर दोन जडीबूटी का घेताय. संपूर्ण पहाडच वापरा ना… अख्खं गाणं करून घ्या असं म्हणाले. हे आमच्यासाठी जणू सोने पे सुहागा असंच होतं. तेजस रानडेनं लिहिलेलं गाणं सचिन सरांना ऐकवलं. त्यांना ते आवडल्यानं त्यांनी गायलं. माणसं मोठी का असतात याची प्रचिती तेव्हा आली. माझ्या एका शब्दावर सचिन सरांचं होकार देणं आणि स्वत:हून पूर्ण गाणं गाण्याची तयारी दर्शवताना मानधनाचा विचारही न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
तेव्हाच मी होकार देतो
ठराविक वेळेनंतर एकाच पद्धतीच्या भूमिका करण्याचा कंटाळा येतो. काहीतरी वेगळं करायचं असतं. याच कारणासाठी बरेच कॅामेडीयन ब्रेक घेतात. मध्यंतरीच्या काळात मनासारखी कामं मिळत नव्हती. टिव्ही शोज सुरू होते. त्यातून चित्रपटांसाठी ताऱखा देणंही शक्य होत नव्हतं. पैसे मिळतात म्हणून येईल ती व्यक्तिरेखा स्वीकारणाऱ्यांपैकी मी नाही. तसं असतं तर मी सर्रास सर्वच चित्रपटांमध्ये दिसलो असतो. मनासारखं कॅरेक्टर, चांगली टीम आणि मानधन या गोष्टी जुळून येतात, तेव्हा करणं शक्य होतं. ‘जयंती’ चित्रपटामध्ये छोटंसं कॅरेक्टर होतं. त्यांना मी विचारलं की, इतके पैसे देऊन मीच का हा रोल करावा असं तुम्हाला वाटतंय ? त्यावर ते म्हणाले की आतापर्यंत पॅडीचे विनोदी रंग रसिकांनी पाहिले आहेत. यात वेगळा पॅडी आहे. ‘जयंती’मधील माझं कॅरेक्टर कथानकाला कलाटणी देणारं होतं. ते जराही विनोदी नसल्यानं स्वीकारलं.
काय क्षण होता तो…
अमिताभ बच्चन आमचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो पाहतात. त्यांना भेटण्याचा योग आला. आहाहा काय क्षण होता तो… हिंदी ‘केबीसी’च्या सेटवर मराठी ‘केबीसी’ची मंडळी गेली होती. तिथं अमिताभ यांना सोनी मराठीच्या टिमची ओळख करून देण्यात आली. ही सोनी मराठीची क्रिएटीव्ह टिम असल्याचं सांगितल्यावर ते म्हणाले की, सोनी मराठीवर एक कॅामेडी शो येतो. ती लोकं खूप चांगलं काम करतात. मला त्यांना भेटायचंय. त्यांना इकडे घेऊन या. मग काय अमित फाळके सेटवर उडतच आला. बच्चनला तुम्हाला भेटायचंय असं त्यानं सांगितलं. दिवस आणि वेळ ठरल्यावर आम्ही भेटायला गेलो. त्यांनी आमच्यासाठी १५-२० मिनिटं ठेवली होती, पण जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या. त्या दिवशी आमची वारी होती रे. आम्ही देवाला भेटायला गेलो होतो. शिर्डीत साईबाबा आणि पंढरपूरात विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहताना मला रडू येतं. तिसऱ्यांदा मी बच्चन यांना साक्षात समोर पाहिल्यावर अश्रू अनावर झाले. मला काही सुचतच नव्हतं. हाताची घडी घालून मी केवळ त्यांच्याकडं बघत होतो. ते सर्वांकडे बघत होते. एकदा त्यांच्याशी नजरानजर झाली आणि अरेरेरेरे… विषयच संपला होता. पुन्हा एकदा माणसं मोठी का होतात याचं हे उदाहरण आहे.