फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद ओकने रिल्सस्टारवरून केलेले वक्तव्य सध्या फार चर्चेत आहे. प्रसादचे असे म्हणणे होते की म्हटले होते की,” रील्स करून आपण अभिनेता किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना वाटत आहे, ते फार मोठ्या भ्रमात आहेत. इंस्टाग्रामवर ज्यांना लाखोंच्या संख्येमध्ये पाहिले जाते त्याच्या नाटकाला दहा माणसंही येत नसतात. रिल्स म्हणजे अभिनय अजिबात नसतो.”
एक स्किट पाहून प्रसादने ही प्रतिक्रिया दिली होती. त्याची ही प्रतिक्रिया काहींना पटली तर काहींना नाही. दरम्यान, सुप्रसिद्ध रीलस्टार सिद्धांत सरफरे याने प्रसादाच्या रीलस्टार वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे म्हणणे आहे की, “मी अभिनेता आहे आणि रील्स करताना कधी थोडं स्लॅपस्टिक करावं लागतं, ज्याला लोक ओव्हर अॅक्टिंग समजतात. पण मला आजवर प्रेक्षकांकडून जे प्रतिसाद मिळाले आहेत, ते माझ्या अभिनयासाठी आणि माझ्या कंटेंटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. नवोदित कलाकार मोठा कसा होणार? तर अशा रील्सद्वारे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवून. नाहीतर फक्त ऑडिशनवरच अवलंबून राहावं लागेल. खरं तर, मला रील्समुळे खूप शिकायला मिळालं आणि माझी कला सादर करण्याची संधी मिळाली. रील करणारा अभिनेता नसतो, असं नाही. उलट अनेक चांगले कलाकार रील्स करू शकतात. टेलिव्हिजन, सिनेमा किंवा रील्स हे सगळेच एका कलाकाराला आपली कला दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.”
सिद्धांताच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी वेगवेगळे मत नोंदवले आहेत. अनेकांना त्याचे मत पटत आहे तर काहींनी प्रसादच्या मताचे समर्थन केले आहे. अभिनेता महेश बेलदरने प्रसादचे समर्थन करत सांगितले आहे की त्यालाही एकदा सोशल मीडियावर फार रिच नसल्याने एका सिनेमातून बाहेर निघावे लागले होते. त्यालाच नव्हे तर अनेक कलाकारांना या गोष्टींना सामोरे जावे लागते.