स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये येणं ही काही आता नवीन गोष्ट नाही. आजपर्यंत अनेक अभिनेत्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत काम करणं पसंत केलं आहे. अशातच अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) , अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत.
नुकतंच ‘द आर्चीज’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये या तीन कलाकारांशिवाय इतरही अनेक चेहरे दिसत आहेत. पोस्टरमध्ये सर्वजण घनदाट जंगलात सहलीसाठी गेलेले दिसत आहेत.‘द आर्चीज’ चं पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर या डेब्यू स्टार्सच्या अभिनंदन सुरु झालं आहे. यामध्ये पहिला क्रमांक बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहे. अमिताभ यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदाला पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘द आर्चीज’चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा केला आहे. ‘द आर्चीज’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
पोस्टरवरून या चित्रपटामध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासह इतर चेहरेही खूपच तरुण दिसत आहेत. ‘द आर्चीज’ या चित्रपटात अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर बेट्टी कपूर आणि सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत दिसणार आहे.






