मुंबई : राजभवनाच्या जनसंपर्क शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘राजभवनचा समुद्र किनारा’ या माहितीपटाचे प्रदर्शन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित होते. यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी राजभवनाशी निगडीत असलेल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजभवन (Rajbhavan) म्हटले की सहसा राजकारणासंबंधी विषयांची चर्चा होते. अधूनमधून राजभवनातील राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची छवी वर्तमान पत्रात छापून येते व राजभवनाच्या सौंदर्याची चर्चा होते. परंतु, महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वाधिक जुने राजभवन आहे. पुर्वाश्रमीचे ‘गव्हर्मेंट हाऊस’ असलेल्या राजभवनाला मोठा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा इतिहास शोधून तो माहितीपट- चित्रपट रूपाने लोकांसमोर येणे गरजेचे आहे. या दृष्टीने दृष्टीने जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) यांच्या सारख्या चित्रपट सृष्टीतील अनुभवी व प्रसिद्ध लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पूर्वीचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवनातील भूमिगत बंकर प्रकाशात आणले. आज त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन उभारण्यात आले असून पंतप्रधांनी देखील त्याला भेट देऊन त्याचे कौतुक केले असे राज्यपालांनी सांगितले. या परिसराचा विस्तृत इतिहास समाजापुढे आणल्यास राजभवन हे प्रेरणाकेंद्र होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
[read_also content=”कोल्हापूरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के; जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तानमध्येही हादरे https://www.navarashtra.com/india/midnight-earthquake-hits-kolhapur-so-earthquake-also-in-jammu-and-kashmir-afghanistan-nrgm-319564.html”]
लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो; आज सन्मानाने बोलावले याचा आनंद – जॅकी श्रॉफ
आपण राजभवनाजवळील तीन बत्ती येथे एका लहान चाळीत लहानाचे मोठे झालो. राजभवन येथे लहानपणी क्रिकेट खेळायला तसेच येथील समुद्र किनाऱ्यावर लपून तर कधी मित्रांच्या मदतीने भीत-भीत यायचो. आज त्याच राजभवनावर राज्यपालांनी सन्मानाने बोलावले, याचा वेगळा आनंद वाटतो, असे जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.
[read_also content=”प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती – उद्धव ठाकरे https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-comment-about-shivsena-and-sambhaji-brigade-alliance-nrsr-319573.html”]
राजभवनाजवळील आपल्या चाळीत ७ खोल्या आणि तीन कॉमन टॉयलेट होते. कालांतराने मॉडेलिंग आणि चित्रपटात यश मिळाल्यानंतर चाळमालकाने आपल्याला चक्क एका टॉयलेटची चावी दिली. त्यामुळे रांगेत लागण्याची गरज राहिली नाही. ही साधी गोष्ट त्याकाळात मोठा बहुमान वाटला होता असे श्रॉफ यांनी सांगितले. राजभवन परिसरातील देवी मंदिर तसेच येथे गेलेले बालपण आपल्या आठवणींच्या सुंदर कुपीत जपून ठेवले आहे, असे जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.