गेल्या काही दिवसापासून ऐतिहासिक, बायोपिक, रहस्यपट अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा मारा सुरु असताना तोच तो पणामुळे कंटाळलेल्या मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक आगळी वेगळी प्रेम कहाणी घेऊन आलेले आहेत. महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख. दिग्दर्शनातलं पदार्पणातलं पाऊल, मोठा विश्रांतीनंतर जिनीलियाचा उत्कृष्ट अभिनय, त्रिकोणी प्रेमाची कथा, जोडीला अतुल संगीतच याचा चपखल मेळ बसवण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय.
चित्रपटाची कथा :
सिनेमाची कथा सुरू होते ती वर्तमान काळ आणि भूतकाळाची सांगड घालून. प्रेयसीवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या सत्त्याचं क्रिकेटवरही तेव्हढाच प्रेम असतं. मात्र मात्र त्याच्या आयुष्यात असं काही घडतं की तो या दोन्ही गोष्टीपासून लांब जातो. नंतरच्या त्याच्या आयुष्यात फक्त दोन गोष्टी असतात एक म्हणजे व्यसन आणि म्हणजे त्याल जीवापाड प्रेम करणारी त्याची बायको श्रावणी.
क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि आयुष्यातुन क्रिकेट आणि प्रेयसी निघून गेल्यानंतर सत्याच्या रिक्त आयुष्यात रंग भरण्याचे प्रयत्न त्याची बायको श्रावणी करते. त्यानंतर त्याचा वर्तमानात भूतकाळ नकळतपणे येतो आणि त्याच आयुष्य बदलू लागत. या बदललेल्या आयुष्याशी तडजोड करताना सत्याचे अनेक पैलू समोर येतात.
भूतकाळातील गोष्टीमुळे वर्तमान काळापासून लांब पळणारा सत्या रितेश देशमुखने अचूक साकारलाय. तर नवऱ्याच्या व्यसनापेक्षा त्याचा त्रास सुटावा अशी भाबडी आशा ठेवून जगात असलेली प्रेमभोळी बायको जिनिलियाने तिच्या अभिनयातून अचूक साकारली आहे. जिया शंकरही आपल्या अभिनयानं प्रभावित करते. गंभीर किंवा विनोदी दोन्ही मध्ये आपला कसदार अभिनयाची छाप सोडणारे अशोक सराफ यांनी वडिलांची भूमिका खूप उत्तम साकारली आहे. तर गंभीर वातावरण विनोद निर्मिती करणारे विद्याधर जोशीनी त्यांची भूमिका अतिशय साधेपणाने केली आहे. तर सत्याच्या मित्राच्या भूमिकेत शुभंकर तावडेनेनं सुरेख रंग भरला आहे. तर या सिनेमाचं सरप्राईज म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका अर्थात बालकलाकार खुशी हजारे हिने हट्टी पण प्रेमळ मुलगी चोख वठवलिये तर रविराज कॅडेने रंगवलेला खलनायक लक्षात राहण्याजोगा आहे. चित्रपटाचे कॅमेरा वर्क ही अतिशय उत्तम आहे.
‘ज्याचं तुमच्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करण्याचं दुखणं तुम्हाला कळणार नाही, असे प्राजक्त देशमुखने लिहिलेले प्रेमपूर्ण संवाद प्रेक्षकांना आता कथांनकासोबत जुळण्यात मदत करतात. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे अजय अतुलच संगीत. प्रेमाच्या अव्यक्त भावनेला वाचा फोडणारे त्यांचं संगीत प्रेक्षकांना वेड लावतं. बेसूरी हे वेगळ्या धाटणीचं गाणं ऐकताना आपण भान विसरून जातो. शेवटी मजिली या तेलगू चित्रपटासोबत तुलना करताना मराठी कथानक संगीत दिग्दर्शन याच्या सहाय्याने या चित्रपटाने दर्जेदार मराठी चित्रपट देण्याची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. प्रेमात वेडा झालेला सत्या आणि जीचं प्रेमच तीच वेड आहे अशी श्रावणीची प्रेमकथा पूर्ण होते का यासाठी हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.
दर्जा : ★★★★
कलाकार : रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, खुशी हजारे, रवीराज केंडे, विनीत शर्मा, विक्रम गायकवाड, अविनाश खेडेकर,
दिग्दर्शक : रितेश देशमुख
निर्मिती: जिनिलिया देशमुख
शैली: रोमँटिक ड्रामा
सकारात्मक बाजू: पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, साउंड इफेक्टस, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू: मजीली या तेलगू चित्रपटाशी होणारी तुलना