तरूणांमध्ये हेडफोन्सची प्रचंड क्रेझ आहे. बस, ट्रेन, रिक्षा, सर्वत्र तरूणांकडे तुम्हाला हेडफोन्स पाहायला मिळतात. पण हेडफोन्सच्या वाढत्या वापरामुळे पुढील 25 वर्षांत 100 करोड तरूण बहिरेपणाचे शिकार होऊ शकतात, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिध्द केला आहे. सध्या 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणांमुळे बहिरेपणाच्या विळख्यात आहेत.
हेडफोन्समुळे 25 वर्षांत 100 कोटी तरुण होणार बहिरेपणाचे शिकार (फोटो सौजन्य-pinterest)
तुम्हाला रेल्वे स्थानकावर, कोचिंग सेंटर्स, कॉलेज, शाळा, सगळीकडेच तरूणांच्या कानात हेडफोन्स पाहायला मिळतात. पूर्वी अशी उपकरणे वृद्ध लोकांच्या कानात पाहायला मिळायची ज्यांना कमी ऐकू यायचं.
सध्या क्लासी लूक, फॅशन आणि छंद म्हणून हेडफोन, इअरफोन आणि इअरबड्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरत आहे. पण हेडफोन किंवा इअरफोनचा अतिवापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिध्द केला आहे.
WHO ने प्रसिध्द केलेल्या अहवलानुसार, 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी तरूण बहिरेपणाचे शिकार होतील आणि त्यांचे वय 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. हेडफोन-इयरफोनमुळे दर चारपैकी एक व्यक्ती बहिरा होईल. हेडफोन, इअरफोन आणि इअरबड्सचा आपल्या आरोग्यावर अत्यंत खोल परिणाम होत आहे.
सध्या 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणांमुळे बहिरेपणाच्या विळख्यात अडकले आहेत. यापैकी 25% लोक सतत इअरफोन, इअरबड्स किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत असतात.
हेडफोन्समधील आवाजाची पातळी 75 dbते 136 db पर्यंत असते. सरासरी, हा आवाज 75db ते 105db दरम्यान असावा. 105db पेक्षा जास्त आवाज आपल्या कानांसाठी धोकादायक आहे.