विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' चित्रपट सध्या देशासह परदेशातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ३ दिवसांतच या ऐतिहासिक चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'छावा' हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनापूर्वी काही सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. यापूर्वीही अनेक बॉलिवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांनीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती, जाणून घेऊया, असे कोणकोणते चित्रपट आहेत ?
chhaava padmavati films that created controversy performed exceptionally well earned crores
विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाराष्ट्रात या चित्रपटातल्या काही सीन्समुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या एका गटाने चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणीही केली होती. पण नंतर दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची माफी मागत सीन्समध्ये बदल करण्याचे आश्वासन देत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला.
'छावा' चित्रपट मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाचे बजेट १३० कोटी इतके आहे. चित्रपटाची सध्या कमाई पाहता 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच, विकी कौशलच्या कारकिर्दीत हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
'छावा'चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाच्याही भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्याने मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
'छावा'च्या आधीही इतिहासावर बनवलेल्या अनेक चित्रपटांवरून भारतात मोठा गदारोळ झाला आहे. त्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. २०१८ मध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर अभिनीत 'पद्मावत' चित्रपटावरून मोठा गोंधळ उडाला होता.
'पद्मावत' चित्रपट इतिहास आणि राजपूत अभिमानाच्या विरोधात असल्याचे म्हटले जात होते. करणी सेनेने देशभरात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती, ज्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव 'पद्मावती' वरून 'पद्मावत' करावे लागले. वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
'पद्मावत' चित्रपटाचे फक्त समीक्षकांनीच नाही तर, प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणावर कौतुक केले. सर्वांनीच चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला. चित्रपटाने भारतात तब्बल २८० कोटी रुपयांची कमाई करून इतिहास रचला.
वादग्रस्त ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत २००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'जोधा अकबर' चित्रपटाचाही समावेश आहे. जो मुघल सम्राट अकबर आणि राजपूत राजकुमारी जोधाबाई यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्याचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते.
वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटात हृतिक रोशनने अकबरची भूमिका साकारली होती आणि ऐश्वर्या रायने राजकुमारी जोधाबाईची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या कथेच्या सत्यतेबद्दल प्रचंड विरोध झाला. पण निषेध आणि गोंधळातही, त्या वेळी चित्रपटाने ५७ कोटी रुपये कमावले होते.