मणिपूरमधील लोकटक तलाव हा ईशान्य भारतातील गोड्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव आहे. याला 'ईशान्येचे रत्न' मानले जाते. या तलावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथे तरंगणारे 'फुमडी'. फुमडी हे माती, वनस्पती, सेंद्रिय पदार्थ आणि कचरा यांच्यापासून तयार झालेले जाड थर आहेत.
पाण्यावर तरंगणारे मणिपूरमधील बेट. (फोटो सौजन्य - Social Media)

हे थर वर्षानुवर्षे एकमेकांत गुंफले गेल्यामुळे इतके मजबूत होतात की त्यावर माणसे सहज चालू शकतात आणि घरेही बांधू शकतात. हे जमिनीचे तुकडे पाण्यावर तरंगत असतात आणि वाऱ्याच्या दिशेनुसार आपली जागाही बदलतात.

या तलावात 'केबुल लामजाओ' (Keibul Lamjao) नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे. हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 'सांगाई' (Sangai) नावाच्या दुर्मिळ हरणाचे शेवटचे नैसर्गिक निवासस्थान आहे. हे हरीण फुमडीवर चालताना डोलते, म्हणून याला 'डान्सिंग डिअर' असेही म्हणतात.

येथील स्थानिकांसाठी हा तलाव उपजीविकेचे मुख्य साधन आहे. फुमडीचा वापर मासे पकडण्यासाठी नैसर्गिक कुंपण म्हणून केला जातो.

इथे रस्ते नाहीत, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होडी हेच एकमेव साधन आहे. अगदी लहान मुलेही होडी चालवत शाळेत जातात.

२०१७ मध्ये येथे भारतातील पहिली 'तरंगती प्राथमिक शाळा' सुरू करण्यात आली होती, जेणेकरून मच्छिमारांच्या मुलांना शिक्षण मिळू शकेल.






