किडनीशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात, जसे की किडनी फेल होणे, किडनीत सिस्ट होणे, किडनी स्टोन आणि किडनी इन्फेक्शन. किडनीच्या आजारांची सुरुवात अनेकदा सहज लक्षात येत नाही. मात्र, थकवा, शरीरावर सूज, श्वास घेण्यास त्रास, मळमळ आणि लघवीत रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. विशेषतः डायबेटीस आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.
किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे. (फोटो सौजन्य - Social Media)
रात्री वारंवार लघवीला जाणे. किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यास शरीरातील द्रव आणि टॉक्सिन फिल्टर होत नाहीत, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.
रात्री जास्त तहान लागणे. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्याने वारंवार तहान लागत असल्यास, किडनीच्या आजाराचे हे लक्षण असू शकते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. किडनीच्या संसर्गामुळे (UTI) लघवी करताना वेदना किंवा जळजळ होऊ शकते.
लघवीत रक्त येणे. किडनी स्टोन, संसर्ग किंवा इतर गंभीर आजारामुळे लघवीत रक्त येऊ शकते. वारंवार झोपेतून जाग येणे. किडनी टॉक्सिन फिल्टर करू शकत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ साचतात, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे. शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच, मीठ आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, कारण हे घटक किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतात.
डायबेटीस आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे, कारण हे दोन्ही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. याशिवाय, नियमित आरोग्य तपासणी करून किडनीचे कार्य वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही धोका टाळता येईल. किडनीच्या आजाराची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अन्यथा उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.