शरीरासाठी लिंबू पाणी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय असते. यामुळे वाढलेले वजन सहज कमी होऊन जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया अतिशय सहज होते, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. पण काहींच्या आरोग्यासाठी लिंबू पाणी अतिशय घातक ठरते. वारंवार लिंबू पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचते. लिंबूमधील आंबटपणामुळे ऍसिडिटीचा त्रास आणखीनच वाढतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
अमृत म्हणून प्यायले जाणारे लिंबू सरबत 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, ज्यामुळे दातांवर आंबटपणाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. दातांवर वाढलेल्या थरामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होऊन जातात.

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस इत्यादी पचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच लिंबू पाणी किंवा आंबट पदार्थ खाऊ नये.

जास्त लिंबू पाणी प्यायल्यास पोटाच्या आतील स्तराला हानी पोहचते. अल्सर आणि सतत पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. पोटासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी लिंबू पाणी अजिबात पिऊ नये.

दिवसभरात सतत लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वारंवार लघवीला होऊ शकते. शरीरात पाणी आणि खनिजांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते.

शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी लिंबू पाणी प्यायले जाते. पण यामुळे काहीवेळा त्वचेसंबंधित समस्या आणि ऍलर्जी होण्याची शक्यता असते.






