गणेशोत्सवात अनेक अशा संस्था आहेत. ज्या विविध गणेश मंडळांना सहकार्य करत असतात. मात्र, नवरात्रोत्सवात अशा संस्था क्वचित पाहायला मिळतात. अशीच एक संस्था म्हणजे 'मुंबईची नवरात्री'. या संस्थेची सुरुवात 2012 साली झाली. अवघ्या सात आठ मंडळांसह या संस्थेची सुरुवात झाली होती. आज या संस्थेत 300 पेक्षा जास्त मंडळांचा सहभाग पाहायला मिळत आहे. तसेच, या संस्थेमार्फत विविध समाजकार्य सुद्धा राबविले जातात. चला या विशेष संस्थेबद्दल जाणून घेऊयात.
7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून 'मुंबईची नवरात्री' संस्थेची सुरुवात
अनेक संस्था गणेशोत्सवात कार्यरत होत्या. मात्र, नवरात्रीसाठी कोणतीच संस्था कार्यरत नव्हती. अशावेळी 2012 साली मुंबईची नवरात्री या संस्थेची सुरुवात झाली. ही सुरुवात एका फेसबुक पेजने झाली होती.
पुढे या पेजवर अनेक मंडळांचे कार्यकर्ते जोडले गेले. तेव्हा या पेजचे रूपांतर संस्थेमध्ये करण्यात आले. या संस्थेत आता 300 पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
'मुंबईची नवरात्री' संस्थेने मुंबईतील अनेक नवरात्रोत्सव मंडळाच्या सहकार्याने अंबरनाथ येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना बॅग, वही, पुस्तक इत्यादी गोष्टी देण्यात आल्या.
तसेच या संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येते. यानिमित्ताने उठ युवा.... निश्चय कर, लसीकरणा आधी रक्तदान कर! असे म्हणत युवांना रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाते.
जे मंडळ नवरात्रीत विविध उपक्रम राबवतात. त्यांचा सन्मान सुद्धा 'मुंबईची नवरात्री' संस्थेकडून केला जातो. यामुळे मंडळांना उत्तमोत्तम कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळते.