राज्यातील पूरग्रस्तांसाठी ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत (फोटो सौजन्य-X)
Siddhivinayak Temple Trust News in Marathi : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेली. शेतातील पिकं अक्षरशः कुजली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलांचे वह्य पुस्तक सर्व काही पुरात वाहून गेले. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदत करणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोठमोठया मंदिर ट्रस्टकडूवन गरजूंसाठी लाखो रुपयांची मदत पुरवली जात आहे. याआधी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून मदत जाहीर करण्यात आली. तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थेकडून मदत मिळाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर करण्यात आली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्यातील गरजू लोकांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने तयार केलेल्या प्रसिद्ध पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या संदर्भात निवेदन दिले आहे. “मागील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री मदत निधीला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे प्रसिद्ध वृत्तपत्राने म्हटले आहे.
“महाराष्ट्रावर संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र पुराच्या संकटातून झुंजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार पुर्ण प्रयत्नदेखील करत आहे. भगवान श्री सिद्धिविनायकांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्र या संकटातून लवकर बाहेर पडो. यासाठी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट बोर्डाने मुख्यमंत्री मदत निधीला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी दिली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टने १ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिर्डीची साईबाबा मंदिर ट्रस्टकडून १ कोटी रुपये आणि तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून १ कोटी रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली आहे.