Law Universities Convocation Controversy:NALSARनंतर आता आणखी एका विद्यापीठात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निमंत्रणाला विरोध
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या पत्रात बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI)चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला असून, NLSIUच्या दीक्षांत समारंभात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या प्रस्तावित उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सध्याचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूमिका व्यक्त केल्या आहेत. हा वाद केवळ दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार, इतकाच मर्यादित नाही. देशातील सर्वोच्च विधी संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभावशाली संस्था आणि सार्वजनिक पदांवरील व्यक्तींशी असहमती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे का, हा यामागचा मूलभूत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असहमती व्यक्त केल्यामुळे आपल्या व्यावसायिक भवितव्यावर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ नये, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, “सत्तेसमोर सत्य बोलण्याचे धैर्य आणि नैतिक बांधिलकी दाखवणाऱ्या NALSARमधील आमच्या सहकारी विद्यार्थ्यांच्या मतांशी आम्ही बिनशर्त एकमत आहोत, असंयी या पत्रात म्हटले आहे.
खास बाब म्हणजे, NLSIUच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाने NALSARमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
बार कौन्सिलने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी वादग्रस्त आदेश जारी करण्यासाठी अधिकृत लेटरहेडचा वापर कोणत्या अधिकाराअंतर्गत केला, असा सवालही पत्रातून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासंदर्भात विरोध झाला होता. त्यानंतर BCIने 2026च्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या वकिली व्यवसायातील नावनोंदणीवर स्थगिती देण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, हा आदेश नंतर मागे घेण्यात आला. BCI अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनीही या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला होता.