Ajit Pawar avoided going to the RSS headquarters Reshimbagh Nagpur
नागपूर : राज्यामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूरमध्ये विधीमंडळाचे हे अधिवेशन सुरु असल्यामुळे राज्यातील सर्वच नेते उपस्थित आहेत. निवडणुकीनंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार तापले देखील आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये आता महायुतीच्या सर्व आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरचे मुख्य कार्यालय असलेल्या रेशीमबागेमध्ये आमंत्रण देण्यात आले होते. मात्र अजित पवार यांची या ठिकाणी असलेली अनुपस्थिती सर्वांच्या लक्षात आली आहे.
नागपूरमध्ये भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय आहे. संघाने महायुतीच्या आमदारांना रेशीमबागेमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. भाजपसह मित्र पक्षातील आमदारांनाही रेशीमबागेतील आरएसएसच्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रेशीमबागेत संघाचे बौद्धिक झाले. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे अनुपस्थितीत राहिले. महायुतीचे इतर दोन पक्षांतील सर्व आमदार उपस्थित होते. मात्र अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी आपली विचारधारा जपून संघाच्या या कार्यक्रमाला दांडी मारली.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संघाकडून महायुतीच्या नेत्यांना बौध्दिक कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात आले होते. मात्र यासाठी अजित पवार हे उपस्थिती लावणार का याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार यांनी संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये जाणे यावेळी देखील टाळले आहे. यापूर्वी देखील लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावेळी महायुतीचे अनेक प्रमुख नेते हे रेशीमबागेमध्ये गेले होते. मात्र अजित पवार यांनी त्यावेळी देखील जाणे टाळले होते. आता नागपूरमध्ये असून देखील अजित पवारांनी पुन्हा एकदा संघाच्या मुख्य कार्यालायामध्ये जाणे टाळले आहे.
‘केशव प्रेरित संघ मार्ग पर चरैवेति की कामना
निशिदिन प्रतिपल चलती आयी राष्ट्र धर्म आराधना..’#Maharashtra #Nagpur #RSS pic.twitter.com/5MbgjWV4Hc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024
अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील होताना देखील शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे चालवणार असल्याचे वक्तव्य केले होते. भाजपसोबत युती केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर आपला रोष व्यक्त केला होता. पण आजच्या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित न राहून अजित पवार यांनी आपली विचारधारा सांभाळली असल्याचे बोलले जात आहे. अमोल मिटकरी यांनी कालच संघ कार्यालयामध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण अजित पवार जाणार की नाही याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील नेते गेले नसले तरी एक आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील तुमसर येथील आमदार राजू कोरमोरे हे उपस्थित असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार गट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. लोकसभेच्या निकालामध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असे यश आले नव्हते. अजित पवार यांची विचारधारा पुरोगामी असून त्यांना महायुतीमध्ये गरज नसताना सामील करुन घेतल्यामुळे रोष व्यक्त केला जात होता. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक चर्चांना पूर्णविराम लागला. विधानसभेच्या निकालामध्ये संघकार्याचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यानंतर देखील अजित पवार यांनी संघ कार्यालयामध्ये जाणे टाळले आहे.