अमित शाह यांच्या वादग्रस्त विधानावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यासह देशभरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधित केलेल्या वक्तव्यावरुन रान पेटले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहामध्ये केलेल्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असल्याची टीका विरोधक करत आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांनी माफी देखील मागितली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये देखील दिसत असून महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आंदोलन करत आहेत.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भाजप नेते अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस पक्ष, ठाकरे गट व शरद पवार गट आक्रमक झाला आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये नाना पटोले, रोहित पवार, आदित्य ठाकरे, सतेज पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते तीव्र आंदोलन करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या आंदोलनावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाबाहेर तीव्र आंदोलन केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “अमित शाह हे जोपर्यंत माफी मागत नाहीत आणि देशाची जनता त्यांना माफ करत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन करणार. राज्यसभेमध्ये ते वाक्य अमित शाह 12 सेकंद बोलले का नाही? तर विपर्यास केला असं कसं म्हणू शकतात? ते बोलले आहेत याबद्दल त्यांनी माफी मागावी. भाजपची मानसिकता यामधून दिसून येत आहे. हा अपमान हा देशाचा आणि देशाच्या संविधानाचा अपमान आहे. हा अपमान नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू स्वीकारणार का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात विधीमंडळाच्या आवारात सुरु असलेल्या आंदोलनावेळी सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. सतेज पाटील म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत चर्चा करायला काय हरकत आहे? तुम्ही तुमची बाजू मांडा आणि आम्ही आमची बाजू मांडतो. जे सत्य आहे ते जनतेसमोर विधीमंडळातून जाऊ दे. अमित शाह यांचं वक्तव्य उभ्या देशाने पाहिले आहे. त्यावर कसालाही उतारा काढला तरी तो उतारा चालणार नाही,” असे मत सतेज पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अमित शाह यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाकडून केली जात आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये या विषयावर चर्चा घेतली जावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केली आहे.