
BJP won election in Maharashtra by 'Votechori' says Congress leader harshvardhan Sakpal, Congress Meeting in Mumbai, Harshvardhan Sakpal slams BJP,
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “SIR मोहिमेअंतर्गत BLA-1 संदर्भातील विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली असून संपूर्ण राज्यात बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची टीम तसेच राज्यातील अनुभवी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पडताळणी, हरकती व दुरुस्त्या यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेशी समन्वय साधून मतदार यादी पडताळणी मोहिमेला गती देण्याचे काम समितीमार्फत करण्यात येणार आहे.
“भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल,” असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, “राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “पेट्रोल डिझेल टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही.”
आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. भाजप मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर सर्व समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे. जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिलेले आश्वासन आणि त्यानंतर उधळलेला गुलाल महाराष्ट्राने पाहिला. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाबाबत सरकारने काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे.”
पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले