राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर रविवारी (दि.15) नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. यामध्ये 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, जुन्यांचा पत्ता कट झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांनाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे नाराज असलेले भुजबळ आता मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार महायुतीमध्ये कलह निर्माण करणारा ठरला आहे. विशेषतः राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीतील मोठे बंडखोरीचे कारण ठरण्याची शक्यता आहे, असे संकेत भुजबळ यांनी सोमवारी दिले. ‘मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय, फेकले काय, काय फरक पडतो? मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले, छगन भुजबळ संपला नाही. जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले’, अशी संतप्त प्रतिक्रिया नाराजीच्या चर्चावर भुजबळ यांनी दिली.
हेदेखील वाचा : Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ; महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच
दरम्यान, मंत्रिमंडळात संधी डावल्यासंदर्भात माध्यमांनी भुजबळांना सवाल केला असता, भुजबळ यांचा तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. ‘होय, मी नाराज’, अशी तीन शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलले जात असल्याचे भुजबळ म्हणाले.
राज्यसभेबाबत पक्षाकडून मला विचारणा
आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते, अशी माहितीदेखील भुजबळ यांनी दिली. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे मी पक्षाला स्पष्टपणे कळवले आहे. मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा त्यांनी केला.
भुजबळांची नाराजी दूर करण्याचे पक्षाचे प्रयत्न सुरु
पक्षाकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात आहे. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करून डॅमेज कंट्रोलची तयारी सुरू झाली आहे. भुजबळ यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी हॉटेलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही भुजबळांची नाराजी कायम आहे.
हेदेखील वाचा : Nehru’s Letter : सोनिया गांधींकडील 51 खोक्यांमध्ये नक्की दडलंय तरी काय? नेहरूंच्या खास दस्तऐवजावरून लोकसभेत गदारोळ