सोनिया गांधींकडील 51 खोक्यांमध्ये नक्की दडलंय तरी काय? नेहरूंच्या खास दस्तऐवजावरून लोकसभेत गदारोळ
संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रावरून गदारोळ सुरू आहे. नेहरूंची ५१ खोक्यांमध्ये असलेलीही पत्र सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी हा दावा केला असून ती परत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या वतीने आधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधींना याबबात पत्र लिहिण्यात आलं आहे. भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे.
इतिहासकार रिजवान कादरी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून सोनिया गांधी यांच्याकडे असलेल्या पं. नेहरूंच्या संबंधित कागदपत्रांची मागणी केली आहे. कादरी प्रधानमंत्री संग्रहालय आणि पुस्तकालयाचे (PMML) चे सदस्य आहेत. 10 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “1971 मध्ये जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडने पं. नेहरूंची खासगी कागदपत्र PMML कडे हस्तांतरित केली होती. ही कागदपत्र भारतीय इतिहासाच्या महत्त्वाच्या कालखंडाबद्दल अमूल्य माहिती देतात. 2008 मध्ये, तत्कालीन युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विनंतीवरून हे कागदपत्र PMML कडून परत घेतली गेली”, असा दावा त्यांनी केला आहे.
#WATCH | BJP MP Sambit Patra says, “Prime Minister’s Museum and Library (PMML) Society member, Rizwan Qadri has written a letter to the Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi requesting that 51 boxes (collection of letters written by Jawaharlal Nehru) taken by Congress… pic.twitter.com/nMmIFJ87Sb
— ANI (@ANI) December 16, 2024
रिजवान कादरी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं की, “माझी बऱ्याच वर्षांपासून पं. नेहरू आणि एडविना माउंटबेटन यांच्यातील पत्रव्यवहारावर संशोधन करावं, अशी इच्छा होती. 2019 पासून मी या पत्रव्यवहाराचा पूर्ण संग्रह सर्वांसमोर मांडण्याची गरज आहे. हा संस्थेचा अमूल्य ठेवा आहे. या ऐतिहासिक दस्तऐवजांची मालकी असलेल्या संस्थेला ते उपलब्ध करणे आवश्यक आहे.”
“9 सप्टेंबर 2024 रोजी मी सोनिया गांधी यांना पत्र लिहून या संग्रहाची प्रत मागितली होती, परंतु त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांनी या विषयावर लक्ष घालावं आणि सामग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. सरकारनेही यात हस्तक्षेप करावा. जर सोनिया गांधी कागदपत्रे परत करण्यासाठी इच्छुक नसतील, तर त्यांची स्कॅन कॉपी तरी द्यावी.”, असं त्यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी कागदपत्रे परत न केल्याबद्दल विचारले असता, कादरी म्हणाले की, “पं. नेहरू आणि लेडी माउंटबेटन यांच्यात काही वाद असू शकतात, पण जोपर्यंत ते आपण पाहत नाही, तोपर्यंत त्यावर मत देणं योग्य ठरणार नाही. मला असं वाटतं की त्या कागदपत्रांमध्ये काहीतरी आहे, म्हणूनच 2008 मध्ये सोनिया गांधी यांच्या विनंतीवर 51 कार्टन कागदपत्रे परत घेण्यात आली. हा मोठा संग्रह आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत परत आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.