शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीची केल्याने विजय वडेट्टीवार आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदी-मराठी भाषेचा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये माय मराठीच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील हिंदी सक्तीला कॉंग्रेसकडून देखील विरोध करण्यात आला आहे.
हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याला राज्यातील अनेकांकडून विरोध केला जात आहे. कॉंग्रेस पक्षाने देखील सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत मांडले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “संघराज्य निर्मितीच्या वेळी भाषेला प्राधान्य देताना राज्यांची मातृभाषा मान्य केली गेली. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून, इंग्रजीसह या दोन भाषा शिक्षण व प्रशासनात वापरल्या जातात. अशा परिस्थितीत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय आहे, हा मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे.” असे स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जर तिसरी भाषा हवीच असेल, तर ती पर्यायी असावी. पण ती सक्तीची करणे हा एकप्रकारे केंद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, जो संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. काही राज्यांनी याला विरोध केला आहे आणि त्यांना धमकावले जात आहे, ही चिंता वाढवणारी बाब आहे. मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकार रक्षणासाठी ही सक्ती तात्काळ मागे घेतली पाहिजे” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यावरुन मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.