फोटो सौजन्य - Social Media
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून लवकरच मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ‘वचननामा’ जाहीर करण्यात येणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि नियोजित मुंबई घडवण्याच्या उद्देशाने हा वचननामा तयार करण्यात आला असून, यामध्ये शासनाने आधीच मंजूर केलेल्या विकासकामांसह नव्या लोकाभिमुख योजनांचा समावेश असणार आहे. या वचननाम्याचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या वचननाम्यात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘लाडकी बहिण’ योजनेनंतर आता महिलांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगाच्या समस्येची दखल घेत, महिलांसाठी कर्करोगावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय जाहीर होऊ शकतो. तसेच स्तन कर्करोगाशी संबंधित सर्व तपासण्या मोफत करण्याचे आश्वासन देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरोग्य सुविधांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परळ येथील केईएम रुग्णालयाचे एम्सच्या धर्तीवर आधुनिकीकरण. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा, सुधारित उपचार सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारून केईएम रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांनाही अद्ययावत करण्यात येणार असल्याचे या वचननाम्यात नमूद आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तरुणांसाठीही या वचननाम्यात महत्त्वाच्या योजना मांडण्यात आल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना करून, विविध डिप्लोमा अभ्यासक्रम सामान्य पदवी अभ्यासक्रमांच्या तुलनेत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून, कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळेल.
मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठीही ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या कार्यरत असलेल्या ७ एअर प्युरिफायरची संख्या वाढवून भविष्यात ६० एअर प्युरिफायर उभारण्याचा प्रस्ताव या वचननाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन मुंबईकरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एकूणच, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा हा वचननामा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित असून, मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडणारा ठरणार आहे. आता या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.






