कणकवली / भगवान लोके : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाची जय्यत तयारी सुरु आहे. सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहत असून अनेक राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर होत आहेत. राज्यस्तरीय सर्वच गटात चुरशीची लढाई होत असल्याचं दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघातील दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर शाब्दिक घणाघात केला आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात जवळपास 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पुढची प्रक्रिया 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे. जे अधिकृत उमेदवार शिल्लक राहतील त्यांच्यात लढत होईल. यादरम्यान महायुतीरकडून मुस्लिम बांधवांमधून एक उमेदवार उभा केलेला आहे. नितेश राणे यांनी मतांची विभागणी व्हावी म्हणून म्हणून मुस्लिम बांधवांचा उमेदवार देण्यात आलेला आहे. पारकर पुढे असंही म्हणाले की, माझ्या नावाला साम्य असणारे संदेश पारकर त्यांचासुद्धा उमेदवारी अर्ज वैध झालेला आहे. संदेश पारकर या नावाची भीती नितेश राणेंनी घेतलेली आहे, असा टोला ठाकरे-शिवसेनेचे संदेश पारकर यांनी लगावला.
ठाकरे गटाचे आमदार संदेश पारकर पुढे म्हणाले की, नितेश राणेंचे भविष्य त्यांना कळून चुकलेले आहे. संदेश पारकर यांना मिळालेला जनाधार त्यामुळे ते निवडून येणार म्हणून त्यांना पडणारी मतांची विभागणी व्हावी किंवा दुसरीकडे मतदान व्हावं यासाठी राणेंचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. येत्या 20 तारीखेला मतदान होईल.त्यानंतर जनतेचा कौैल हा दि. 23 तारीखेला पाहायला मिळेल. विधानसभेच्या या निकालावर महाविकास आघाडीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल, असं संदेश पारकर म्हणाले आहेत.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर , तात्या निकम , आदीत्य सापळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी युतीत होते तेव्हाचे दिवस आठवावे. भाजप सोबतचा इतिहास तपासावा, तेव्हा कसे होता ? तेव्हा काय मान सन्मान कसा होता.आता असा कचरा केला आहे की 88 जागा घ्यायच्या तर घ्या नाहीतर बाजूला व्हा. राहुल गांधी च दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालेलं आहे. कारण राहुल गांधीच्या डाव्या उजव्यासोबत उद्धव ठाकरेंना भोगावं लागत आहे. राहुल गांधी यांच्याजवळ पास पण नाही. नियतीचा खेळ असा आहे की राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा आता फोनही घेत नाही आहेत. 2019 ला सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन घेतला नाही. आज राहुल गांधी यांचे फोन घेत नाही, याला नियतीचा फेरा म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका तुमची लायकी काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला योग्य पद्धतीने दखवलेली आहे. अशी कडव्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.