
eknath shinde
दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता, दिल्लीला येण्यासाठी विशेष कारण असण्याची गरज नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी स्थानिक निवडणुकांचा आढावा घ्यायचा आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील महाविद्यालयातील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर अमित ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो खाली उतरवल्याचे सांगण्यात येते.
Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
या घटनेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी कार्यालयांमध्ये काही छायाचित्रे लावण्याबाबत ठरावीक प्रोटोकॉल असल्याचे सांगितले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो कार्यालयात लावला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी महाराजांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचाही शिंदे यांनी उल्लेख केला. मोदींनी शिवाजी महाराजांना दैवतासमान मान दिला असून नौदलाच्या ध्वजावरही त्यांना स्थान दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नसल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, असा उल्लेख करत शिंदे यांनी आधी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला.
न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, पक्षाची घटना आणि लोकशाहीच्या चौकटीत या प्रकरणाची सुनावणी होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कुणबी प्रमाणपत्रासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती आणि इतर समाजांवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. त्यामुळे सध्याच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.