गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन
कोल्हापूर : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राजकारणाबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. गोकुळच्या मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आपल्याला फोन आला होता. त्यावेळी पवारांनी दिलेला सल्ला आजही लक्षात असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सतेज पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांविषयी भाष्य करताना शरद पवारांनी “मतमोजणी केंद्र सोडू नको” असा सल्ला दिल्याचे सांगितले. (Gokul Election)
सतेज पाटील म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना निकालाला विलंब होत होता. त्याचवेळी दुपारी चार ते पाचच्या सुमारास शरद पवारांचा फोन आला. आपण मोटारसायकलवरून मतमोजणी केंद्रावर गेलो होतो. पवारसाहेबांनी फोन करून काय सुरू आहे, अशी विचारणा केली.
NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
त्यावेळी मतमोजणी केंद्रावर थोडा गोंधळ सुरू असल्याचं आपण त्यांना सांगितलं. यावर पवारांनी एकच महत्त्वाची सूचना केली. संपूर्ण मतमोजणी पूर्ण होऊन निकाल आणि विजयाचं प्रमाणपत्र हातात येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नकोस, असं त्यांनी सांगितलं. आपणही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बाहेर पडणार असल्याचं त्यांना सांगितल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपप्रणित महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारलं असता सतेज पाटील यांनी अशी शक्यता नसल्याचं मत व्यक्त केलं. अजितदादा असताना काही चर्चा झाल्या असतील, मात्र आता विलिनीकरण होईल असं अजिबात वाटत नाही, असं ते म्हणाले.
भाजपला सरकारमधील पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याशिवाय राजकीय फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष खिळखिळे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार आणि विलिनीकरणाचा विषय पुढे जाणार नाही, याची आपल्याला 100 टक्के खात्री असल्याचं सांगत सतेज पाटील यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
Ans: मतमोजणी पूर्ण होऊन निकाल आणि विजयाचं प्रमाणपत्र हातात येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नको, असा सल्ला शरद पवारांनी सतेज पाटलांना फोनवरून दिला होता.
Ans: सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपप्रणित महायुतीने 12 जागा जिंकल्या होत्या.
Ans: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल असं आपल्याला वाटत नसल्याचं सतेज पाटील म्हणाले. शरद पवार आणि विलिनीकरणाचा विषय पुढे जाणार नाही, याची 100 टक्के खात्री असल्याचंही त्यांनी सांगितलं.






