
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis
Harshvardhan Sapkal on CM Devendra Fadnavis : दिल्लीत आज (रविवार, 1 नोव्हेंबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी INDIA आघाडीकडून जोरदार आंदोलन करण्यात येतंय. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘चलो दिल्ली’ आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे ठाण्यात विरोधी पक्षाविरुद्ध महायुतीकडूनदेखील मोठे आंदोलन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. (Harshvardhan Sapkal)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी INDIA आघाडी तसेच राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला चीनकडून फंडिंग मिळतंय का? असा गंभीर सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर सडकून टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यात आयोजित या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
सभेत बोलताना फडणवीसांनी राहुल गांधींच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विरोधकांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांमुळे संविधानाने निर्माण केलेल्या महत्त्वाच्या संस्थांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसला चीनकडून मिळणाऱ्या कथित आर्थिक मदतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “राहुल गांधी नेहमी व्हिएतनाम, थायलंडला जातात. तिकडे कशासाठी जातात? मी राहुल गांधींना सवाल करतो, भारताला पाण्यात पाहण्यासाठी, भारतात घुसखोरी कारण्यासाठी कोणता देश आतुर आहे? तर तो चीन आहे. मग राहुल गांधी मला सांगा, चीनकडून काँग्रेस आणि तुमच्या ट्रस्टला डोनेशन का मिळत आहे? चीनच्या पैशांवर भारतात अराजकता तयार करत आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन सपकाळ आपल्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हणाले, “राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीत आयोजित ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीत लाखो लोक सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळलेला हा जनसागर आता मतचोरांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही, याची जाणीव झाल्याने मतचोरीच्या जोरावर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते वाटेल तसे बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत.”
“चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत साबरमतीच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झोके घेत होते, तेव्हा चीनकडून त्यांना फंडिंग झाले होते का? फडणवीसांनी याचेही उत्तर द्यावे. राज्यातील अडीच कोटी मृत मतदारांची नावे एसआयआरमधून वगळण्यात आली, असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. कोणतीही वस्तुस्थिती तपासल्याशिवाय ते बिनधास्त खोटे बोलत आहेत.”
“काँग्रेस पक्षाने एकही बीएलए (BLA) नियुक्त केला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा दावाही धादांत खोटा आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती घेतली असती, तर काँग्रेस पक्षाचे तब्बल ५६ हजार बीएलए कार्यरत आहेत, हे त्यांना समजले असते. मात्र, सातत्याने खोटे बोलण्याची सवयच त्यांना जडली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबतचे खोटे ट्विट डिलीट करण्याची वेळ फडणवीसांवर आली. आता आजच्या भाषणातील बिनबुडाचे आरोपही त्यांना मागे घ्यावे लागतील. त्यामुळे फडणवीसजी, तुम्हाला एवढेच सांगणे आहे. Get Well Soon!”
एकीकडे फडणवीसांचे आरोप, तर दुसरीकडे सपकाळांचं प्रत्युत्तर, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून रॅली
Ans: हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्टमधून फडणवीसांवर टीका करत 'फडणवीसजी, Get Well Soon!' असा टोला लगावला.
Ans: काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या संबंधित ट्रस्टला चीनकडून डोनेशन का मिळतं, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तसेच चीनच्या पैशांवरून देशात अराजकता निर्माण केली जात असल्याचा आरोप केला.
Ans: सपकाळ यांनी मोदी-जिनपिंग भेट, मतदार यादीतील कथित त्रुटी, SIR प्रक्रिया आणि काँग्रेसचे 56 हजार BLA कार्यरत असल्याचा दावा या मुद्द्यांवरून फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.