
India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह 'इंडिया'च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
निवडणूक आयोगाच्या कथित अनियमिततांबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या (India Alliance) ‘इंडिया’ आघाडीतील ११ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही याचिका 12 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये याचिकेची नोंद झाली असून, तिचा डायरी क्रमांक 64196/2026 आहे. सध्या या प्रकरणाची स्थिती प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या याचिकेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सौगत रॉय, अखिलेश यादव, तेजस्वी प्रसाद यादव, संजय राऊत, एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माजी, सुप्रिया सुळे आणि ई. टी. मोहम्मद बशीर यांचा समावेश आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता प्रसन्ना एस. हे बाजू मांडत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू व विवेक जोशी यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आल्याची माहिती आहे.
Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अलीकडील निवडणुकांमधील कथित अनियमितता, मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांचा याचिकेत समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचिकेची संपूर्ण प्रत अद्याप सार्वजनिक झालेली नसल्याने त्यातील नेमके मुद्दे स्पष्ट झालेले नाहीत.
राहुल गांधी यांनी यापूर्वीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ‘व्होट चोरी’चे आरोप केले आहेत. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संभाव्य सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सुनावणी होणार की नाही, याबाबत न्यायालयाच्या अधिकृत कामकाजातून स्पष्टता येईल.