राज्यसभा खासदार शपथ घेताना ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले लूक केला (फोटो - सोशल मीडिया)
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. ज्योती वाघमारे या पुरोगामी विचारांच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा राज्यसभेमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली. सावित्रीबाई फुले यांच्या पोषाखामध्ये ज्योती वाघमारे यांनी शपथ घेतली .
हे देखील वाचा : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला
ज्योती वाघमारे यांनी निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्याचबरोबर सावित्रीमाईंप्रमाणे आडवं कुंकू आणि नथ घातली होती. तसेच हातामध्ये संविधान घेऊन ज्योती वाघमारे राज्यसभेमध्ये दाखल झाल्या. डोक्यावर पदर घेतलेल्या ज्योती वाघमारे या सावित्रीबाई फुलेंप्रमाणे राज्यसभेमध्ये दाखल झाल्या. यामुळे शपथ घेताना ज्योती वाघमारे यांच्याकडे सर्व संसदेचे लक्ष वेधले गेले.
राज्यसभेमध्ये ज्योती वाघमारे यांनी मराठीमध्ये शपथ घेतली. मी डॉ. ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची शपथ घेते की… असे म्हणत त्यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती व उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. आणि ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले. कोणत्याही व्यक्तीच्या नावाशिवाय फक्त संविधानाची साक्ष घेत ज्योती वाघमारे यांनी खासदारकीची शपथ घेतली.
हे देखील वाचा : आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवी पॉलिसी
शपथ घेतल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. याची आठवण करुन देत ज्योती वाघमारे यांनी सभापतींना नमस्कार केला. “तुम्ही महाराष्ट्रातून आहात. मला आशीर्वाद द्या,” असा संवाद ज्योती वाघमारे यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याशी केला आहे.






