Kho Kho Championship : मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस; खो-खोच्या मैदानात खेळाडूंचा कस
Kho Kho Championship : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2026-27 ला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी महिलांचे पाच आणि पुरुषांचा एक सामना रंगला. महिलांमध्ये ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, श्री समर्थ व्यायाम मंदिर, शिवनेरी सेवा मंडळ, ओम साई ईश्वर सेवा मंडळ आणि सरस्वती कन्या संघाने विजय प्राप्त केले आहे.
तर पुरुषांमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने विजयाची पताका फडकावली. जिल्ह्याच्या अजिंक्यपदाबरोबर मुंबई संघातील स्थानासाठी सुरू झालेल्या या संघर्षाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून रंगत वाढवली. मैदानावर चपळाई, पाठलागात आक्रमकता, संरक्षणात संयम आणि प्रत्येक गुणासाठी जीव ओतून लढण्याची जिद्द अशा खो-खोच्या अस्सल थराराने माटुंग्यातील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे मैदान पहिल्याच दिवशी दुमदुमले.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रोहित राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. रुपाली ठाकूर, विश्वस्त वैशाली भिडे-बर्वे, अथेना ग्लोबल लॉजिस्टिकचे अल्बर्टिनो मस्करेन्हास व सहाय्यक महाव्यवस्थापक श्री प्रसाद राऊळ, महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन क्षितिज वेदक, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचे विश्वस्त उन्मेष नरवणे, अभिजात एंटरप्रायझेसच्या संस्थापक वसुधा देशपांडे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब तोरसकर, मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, नितीन पाटील यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि खो-खो कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांच्या सलामीच्या सामन्यात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने संघशक्तीचा 10-7 असा पराभव करत तीन गुणांनी विजय साजरा केला. मध्यंतराला 5-3 अशी आघाडी मिळवणाऱ्या ओम समर्थ भारतने उत्तरार्धातही आपली पकड कायम ठेवली. विजयी ओम समर्थकडून अवनी पाटील (4 गुण, 1.10 मिनिटे संरक्षण व 1 गुण), श्रिया ताम्हणकर (2 गुण, 1.30 मिनिटे संरक्षण) आणि गौरी बारे (नाबाद 3 मिनिटे संरक्षण, 3 गुण) यांनी निर्णायक योगदान दिले.
पराभूत संघशक्तीकडून ईशाली आंब्रे (2.40 मिनिटे, 3 मिनिटे संरक्षण व 3 गुण), अथश्री तेरवणकर (2.20 मिनिटे, 1.30 मिनिटे संरक्षण) आणि काजल मोरे (1.50 मिनिटे, 1.30 मिनिटे संरक्षण व 2 गुण) यांनी झुंज दिली; मात्र विजयाचे पारडे प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने झुकले.
IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने अमर हिंद मंडळावर 9-7 अशी मात करत एक डाव आणि दोन गुणांनी विजय नोंदवला. मध्यंतराला 9-2 अशी मोठी आघाडी मिळवणाऱ्या श्री समर्थने प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची संधीच दिली नाही. श्री समर्थच्या श्रिया नाईक (नाबाद 5.30 मिनिटे संरक्षण व 3 गुण), सोनम शेलार (2.30 मिनिटे संरक्षण व 3 गुण) आणि तन्वी मोरे (2.20 मिनिटे संरक्षण व २ गुण) यांच्या प्रभावी कामगिरीने श्री समर्थच्या विजयाला आकार दिला.
पराभूत अमर हिंदकडून नताशा नतापे (3.10 मिनिटे संरक्षण), प्राजल पताडे (2 मिनिटे संरक्षण व 2 गुण) आणि मधुर पेडणेकर (1.30 मिनिटे संरक्षण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण श्री समर्थची आघाडी मोडण्यात त्यांना अपयश आले.
महिलांच्या तिसऱ्या लढतीत शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा 9-7 असा दोन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला 3-3 अशी बरोबरी असल्याने सामना अखेरपर्यंत चुरशीचा राहिला; निर्णायक क्षणी शिवनेरीने बाजी मारली. शिवनेरीच्या आरुषी गुप्ता (3 गुण, 1.40 मिनिटे संरक्षण व 3 गुण), मुस्कान शेख (1.40 मिनिटे, 2.50 मिनिटे संरक्षण व 2 गुण) आणि सिद्धी शिंदे (2.50 व 3.20 मिनिटे संरक्षण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
पराभूत वैभवकडून स्फूर्ती चांदुरकर (5 गुण, 2 मिनिटे संरक्षण), मानसी आंबोकर (2.10 व 1.30 मिनिटे संरक्षण व 2 गुण) आणि अवंतिका आंबोकर (2 मिनिटे संरक्षण व 2 गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र दोन गुणांची कमतरता वैभवला विजयापासून दूर ठेवून गेली.
महिलांच्या पाचव्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचा 9-6 असा एक डाव आणि तीन गुणांनी दणदणीत पराभव केला. मध्यंतराला 9-2 अशी आघाडी घेत सरस्वती कन्या संघाने सामन्याच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक वर्चस्व मिळवले. पहिल्या सामन्यात विजयी ठरलेल्या ओम समर्थ भारतला दुसऱ्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
Ans: मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनने 2026-27 च्या पुरुष-महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
Ans: मुंबईतील माटुंगा येथील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
Ans: ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, श्री समर्थ व्यायाम मंदिर, शिवनेरी सेवा मंडळ, ओम साई ईश्वर सेवा मंडळ आणि सरस्वती कन्या या संघांनी विजय मिळवला.






