बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवार देण्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Baramati by election : मुंबई : बारामतीमध्ये अजित पवारांनंतर पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्ज दाखल केला जात आहे. मात्र बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणार नसल्यासे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटाकडून घरातील सदस्य वारल्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शरद पवारांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीने असमर्थन दाखवत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडून आकाश मोरे हे बारामतीची निवडणूक लढवणार आहे. यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) प्रश्न केला. यावर तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच बारामती पोटनिवडणुकीवर देखील भाष्य केले. काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला आहे. यााबाबत प्रश्न विचारताच खासदार राऊत म्हणाले की, हे प्रश्न तुम्ही इतर पक्षांना का विचारत नाही? महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी त्या निवडणूक लढवत आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. काँग्रेसने उमेदवार उभा केला असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे, अशी माहिती खासदार राऊतांनी दिली.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरेंचे तगडे आव्हान? काँग्रेसने का दिली मोरेंना संधी?
पुढे ते म्हणाले की, “सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही दूरध्वनी केला होता. हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे यांचाच आहे का? यात अनेक घटक आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा गड आहे. राजकारणात काही विषय सामोपचाराने सोडवावे लागतात. तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? आता फडणवीस यांनी नेत्यांमध्ये चर्चा घडवून आणावी.आता अर्ज भरला आहे. अर्ज मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अर्जाची छाननी होते, प्रचाराचा शुभारंभ होतो. त्या काळात पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख पक्ष असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेस बिनविरोध निवडणुकीच्या पॅटर्नला विरोध करते; असाच विरोध फडणवीसांनीही पूर्वी केला आहे. नांदेडमध्येही असेच झाले होते. त्यांच्या पक्षाने उमेदवार दिला आणि अमित शाह प्रचारासाठी आले होते,” अशी आठवण राऊतांनी सांगितली.
हे देखील वाचा : बिनविरोध होणार? छगन भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत
अजित पवार भाजपसोबत गेले हे विसरून चालणार नाही
खासदार राऊत यांनी भाजपचा पोटनिवडणुकीबाबत इतिहास सांगितला. ते म्हणाले की, “पंढरपूरमध्येही असेच घडले. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीत उभ्या राहिल्या, तेव्हा अजित पवार यांनी नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी निवडणुका व्यासपीठ ठरतात. देवेंद्र फडणवीस हे पॅटर्न बदलत आहेत. राज्यात त्यांचे आणि केंद्रात मोदींचे सरकार आल्यापासून संवेदनशीलता कमी झाल्याचे जाणवते. आजही आपण एकमेकांशी बोललो तरी ईडीची कारवाई होते. उद्धव ठाकरे यांचे अजित पवारांशी चांगले संबंध होते, पण ते भाजपसोबत गेले हे विसरून चालणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही आमचे संबंध होते, पण ते आता कोणत्या बाजूला आहेत, हे सर्वांना माहीत आहे. ती बाजू महाराष्ट्राच्या हिताची नाही, स्वाभिमानाची नाही. राजकीय निर्णय घेताना चर्चा करावी लागते, विचार करावा लागतो. काही वेळा नातेसंबंध बाजूला ठेवावे लागतात,” असे वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले आहे.






