Manoj Jarange Patil Maratha reservation aandolan Mumbai khau galli closed Rohit Pawar slams
Maratha Reservation : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु असून लाखो समर्थक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांना केवळ 5 हजार आंदोलकांसह एक दिवसीय आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मात्र हजारो समर्थक मुंबईच्या विविध भागामध्ये दाखल झाले आहे.
मुंबईमध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सराकरकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सरकारकडून मुंबईतील खाऊगल्ल्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयामुळे आंदोलकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून मोर्चामध्ये सामील झालेल्या आंदोलकांची मुंबईमध्ये खाण्याची तारांबळ होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सरकारच्या निर्णयाला जाचक असल्याचे म्हटले आहे. यावरुन टीका करताना रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!” अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.